झेंडा सत्याग्रहातून पेटल्या क्रांतीच्या मशाली

By Admin | Updated: August 9, 2014 00:34 IST2014-08-08T23:27:44+5:302014-08-09T00:34:25+5:30

संजय तिपाले , बीड ९ आॅगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकारला ‘चले जाव’ चा इशारा दिला होता़ याचवेळी त्यांनी जनतेला ‘करो या मरो’ असे आवाहन केले होते़

Magnolia marches from the Satyagraha | झेंडा सत्याग्रहातून पेटल्या क्रांतीच्या मशाली

झेंडा सत्याग्रहातून पेटल्या क्रांतीच्या मशाली



संजय तिपाले , बीड
९ आॅगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकारला ‘चले जाव’ चा इशारा दिला होता़ याचवेळी त्यांनी जनतेला ‘करो या मरो’ असे आवाहन केले होते़ गांधीजींच्या या आवाहनाला बीडमधून त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला होता़ जिल्हाभर ‘झेंडा सत्याग्रह’ करुन क्रांतिकारकांनी इंग्रज सरकारविरुद्ध रान पेटविले होते़ तेथून पुढेच क्रांतीच्या मशाली प्रज्वलित झाल्या अन् इंग्रज राजवटीला हादरा बसला़ क्रांती दिनाच्या निमित्ताने टाकलेला प्रकाशझोत़़़
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बीड जिल्ह्यातील क्रांतिकांरकांचे योगदान दखलपात्र होते़ क्रांतीदिन हा स्वातंत्र्यलढ्याचाच एक भाग होता़ या लढ्यात बीडमधील क्रांतिकारकांनी हिरीरीने सहभाग घेतला़ बीडमधील पुरुषोत्तमराव चपळगावकर, काशिनाथराव जाधव, रामलिंग स्वामी यांच्या नेतृत्वाखाली मोठा सत्याग्रह झाला होता़ त्याकाळी तिरंगा झेंडा फडकावणाऱ्यांना इंग्रज सरकार डांबून ठेवत असे़ मात्र, देशप्रेमाने भारावलेले लोक हातात तिरंगा झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले़ इंग्रजांकडून होणाऱ्या कारवाईची पर्वा न करता जिल्ह्यात गावोगावी झेंडा सत्याग्रह करण्यात आला़ त्यामुळे क्रांतीच्या मशालींचे भडक्यात रुपांतर झाले़ स्वातंत्र्यलढ्याच्या आंदोलनाची तीव्रता यापुढे अधिक वेगाने वाढली़
नोकरीवरुन काढले, गावबंदी केली!
क्रांती आंदोलनाची तीव्रता अंबाजोगाई येथे अधिक होती़ योगेश्वरी शाळेचे शिक्षक बाबासाहेब परांजपे, ग़ धो़ देशपांडे यांनी इग्रंजांकडून होणाऱ्या अन्याय- अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली़ सामान्यांच्या मनात क्रांतीच्या भावना निर्माण करण्यात त्यांचा पुढाकार होता़ याबदल्यात इंग्रज सरकारने त्यांना नोकरीवरुन काढले, त्यांना गावबंदी केली;परंतु याला भीक न घालता त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात आग्रही भूमिका घेतली़ त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळाली.
अंबाजोगाईच्या पोस्ट
कार्यालयावर हल्लाबोल
श्रीनिवास खोत, धोंडू पवार, श्रीनिवास अहंकारी या क्रांतिकारकांनी अंबाजोगाई पोस्ट कार्यालयावर हल्लाबोल केला़ तेथील तारा उखडून फेकल्या़ संदेशवाहनांची तोडफोड करुन इंग्रज व निजामांचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला़ त्यानंतर आंदोलन अधिक व्यापक तर झालेच; पण इंग्रजसरकारविरुद्ध रोष वाढला़ त्यामुळे इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडण्यात यश मिळाले.

इतिहासाचे अभ्यासक डॉ़ सतीश साळूंके यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ९ आॅगस्ट हा क्रांती दिन म्हणून संबोधला जातो़ याच दिवशी महात्मा गांधी यांनी संपूर्ण देशाला करा किंवा मरा असा संदेश देऊन देशभक्तीची लाट निर्माण केली होती़ क्रांती दिन हा स्वातंत्र्यलढ्याचाच एक भाग आहे;पण याच काळात हैद्राबादेतील जनता निजामांच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी लढत होती़ त्यामुळे बीडसह मराठवाड्यातील जनतेने एकाचवेळी निजाम व इंग्रजांच्या विरोधात एल्गार पुकारला़ त्यामुळे या दोन्ही राजवटीला मोठा हादरा बसला होता, असेही डॉ़ साळूंके यांनी सांगितले़

Web Title: Magnolia marches from the Satyagraha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.