नाताळसाठी विशेष रेल्वे सोडण्यास ‘खो’
By Admin | Updated: December 23, 2014 00:15 IST2014-12-23T00:15:27+5:302014-12-23T00:15:27+5:30
औरंगाबाद : सुट्यांनिमित्त विविध ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी औरंगाबादमार्गे विशेष रेल्वे सोडण्याकडे दक्षिण मध्य रेल्वे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे.

नाताळसाठी विशेष रेल्वे सोडण्यास ‘खो’
औरंगाबाद : सुट्यांनिमित्त विविध ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी औरंगाबादमार्गे विशेष रेल्वे सोडण्याकडे दक्षिण मध्य रेल्वे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे. नाताळच्या सुट्यांनिमित्त प्रवाशांना तोच अनुभव येत असून, पुन्हा एकदा ‘दमरे’ विशेष रेल्वे सोडण्याच्या मागणीला ‘खो’ देत आहे.
नाताळच्या सुट्यांनिमित्त विविध ठिकाणी पर्यटनासाठी जाण्याचे नियोजन प्रवाशांकडून केले जात आहे. रेल्वेचा प्रवास सोयीचा आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा असल्याने सर्वसामान्य प्रवाशांकडून त्यास प्राधान्य दिले जाते. परंतु त्या तुलनेत प्रवाशांना सुविधा देण्याकडे रेल्वे प्रशासन कायम दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येते. नाताळनिमित्त दरवर्षी गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या असते. अशा प्रवाशांच्या सुविधेसाठी गोव्याला विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली जात आहे. परंतु या मागणीकडे सातत्याने दुर्लक्षच केले जात आहे. अवघ्या पाच दिवसांवर नाताळ सण आला असून, विशेष रेल्वे सोडली जाईल का, याचीच प्रवाशांकडून प्रतीक्षा केली जात आहे. परंतु दक्षिण मध्य रेल्वेचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. गोव्यासह जोधपूर, बंगळुरू आदी ठिकाणी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.४
विशेष रेल्वेअभावी जादा पैसे मोजून अन्य वाहतुकीची सुविधा वापरण्याची वेळ प्रवाशांवर सातत्याने येत आहे. शिवाय सुट्यांनिमित्त रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते. त्यामुळे अशा वाढलेल्या गर्दीतून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.४
गोव्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. अनेकांकडून त्यात खोडा घातला जात आहे. मराठवाड्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असताना अन्य ठिकाणी जोधपूर, बंगळुरूसाठी विशेष रेल्वे सोडल्या जात असल्याचे मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा म्हणाले.