डोळ्यात मिरची टाकून एक लाख लुटले ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:04 IST2021-06-29T04:04:01+5:302021-06-29T04:04:01+5:30
भराडीच्या बसस्थानक परिसरातील घटना : पोलीसांनी तपास चक्के फिरवली सिल्लोड : बॅंकेतून एक लाख रुपये काढून दुचाकीवरून जात असलेल्या ...

डोळ्यात मिरची टाकून एक लाख लुटले ?
भराडीच्या बसस्थानक परिसरातील घटना : पोलीसांनी तपास चक्के फिरवली
सिल्लोड : बॅंकेतून एक लाख रुपये काढून दुचाकीवरून जात असलेल्या एका कामगाराच्या डोळ्यात पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील अज्ञातांनी मिरची पूड टाकून त्याच्याकडील एक लाख रुपये रक्कम हिसकावून पोबारा केला. ही घटना तालुक्यातील भराडी गावातील बसस्थानक परिसरात सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली असून, समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे. सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
भराडी येथील एका व्यापाऱ्याने त्याच्या कामावरील व्यक्तीला बॅंकेतून एक लाख रुपये काढून आणण्याचे सांगितले. त्या कर्मचाऱ्याने दुपारी बॅंकेतून रक्कम काढली आणि तो दुकानाकडे जात होता. दरम्यान, बसस्थानक परिसरात अज्ञातांनी ‘त्या’ कामगाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून जखमी केले. तर त्याच्याकडील एक लाखांची बॅग हिसकावून पोबारा केला. या घटनेबाबत समाजमाध्यमावर चर्चा सुरू झाली. यासंबंधी सिल्लोड ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच सपोनि प्रल्हाद मुंढे, पोलीस उपनिरीक्षक विकास आडे व बिट जमादार चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भरवस्तीत दुपारी ही घटना घडल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.
--
चौकशीनंतरच गुन्हा दाखल होईल
डोळ्यात मिरची टाकून एका इसमाची रक्कम लुटली आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू आहे. कुणी तक्रार दिलेली नाही. मात्र ही घटना खरी असेल तर त्यात गुन्हा दाखल करण्यात येईल. प्रत्यक्ष काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही आडळून आलेले नाही. त्यामुळे लूटमार झाली की त्याचा बनाव आहे हे तपासात निष्पन्न होईल.
- प्रल्हाद मुंढे, सपोनि, सिल्लोड ग्रामीण