भविष्याचा वेध ! औरंगाबादेतील उद्योगांची गुंतवणूक २ हजार कोटींच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2022 18:25 IST2022-01-28T18:20:29+5:302022-01-28T18:25:01+5:30

औरंगाबादेतील उद्योगांनी आता कात टाकली असून येथील सूक्ष्म, लघु, मध्यम (एमएसएमई) उद्योगांना चालना मिळणार आहे.

Looking to the future! Industries in Aurangabad invest Rs 2,000 crore | भविष्याचा वेध ! औरंगाबादेतील उद्योगांची गुंतवणूक २ हजार कोटींच्या घरात

भविष्याचा वेध ! औरंगाबादेतील उद्योगांची गुंतवणूक २ हजार कोटींच्या घरात

- विजय सरवदे
औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रे बाधित झाली. प्रामुख्याने अनेक उद्योगांची आर्थिक स्थिती डबघाईला आली. मात्र, भविष्याचा वेध घेत औरंगाबादेतील उद्योगांनी मरगळ झटकत अलीकडच्या दोन वर्षांत विस्तार आणि वाढीसाठी तब्बल २ हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतणूक करण्याचे धाडस केले आहे.‘सीएमआयए’ या उद्योग संघटनेने कोरोनामुळे औरंगाबादेतील उद्योगांवर झालेला परिणाम, याविषयी सर्वेक्षण केले.

वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा आणि पैठण रोडवरील चितेगाव औद्योगिक क्षेत्रांतील उद्योगांची सद्यस्थिती जाणून घेतली. तेव्हा उलटे परिणाम समोर आले. फेब्रुवारी २०२० ते डिसेंबर २०२१ पर्यंत औरंगाबादेतील बहुराष्ट्रीय कंपन्या, स्थानिक मोठे, मध्यम व लहान कंपन्यांनी आपल्या उद्योगवाढीसाठी २ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक केल्याचे चित्र सर्वेक्षण अहवालात समोर आले.

आर्थिक परिस्थिती कोलमडलेली असताना उद्योगांनी विस्तार व वाढीसाठी एवढे धाडस करण्याचे कारण सांगताना ‘सीएमआयए’चे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू यांनी सांगितले की, कोरोनामुळे मागील दोन वर्षांत आयातीवर निर्बंध आले. सुटे भाग किंवा कच्चा मालाच्या आयातीवर परिणाम झाला. दुसरीकडे, परदेशातून काही वस्तू आयात करण्यापेक्षा आपल्या देशातही त्याचे उत्पादन होऊ शकते, यासाठी अनेक उद्योगांनी कंबर कसली आहे. याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता लोकांचा कल सुरक्षित प्रवासाकडे वाढला आहे. त्यामुळे कार, दुचाकी वाहन उद्योगांना चांगले दिवस आले आहेत. यामुळे ऑटोमोबॉईल, अभियांत्रिकी उद्योग तसेच अन्य उद्योगांनी सुटे भाग पुरविण्याच्या हेतूने कंपन्यांचा विस्तार करण्याचे धाडस केले आहे. संभाव्य बदलाच्या पार्श्वभूमीवर काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मोठमोठ्या उद्योगांना मशिनरी पुरविण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. परिणामी, औरंगाबादेतील उद्योगांनी आता कात टाकली असून येथील सूक्ष्म, लघु, मध्यम (एमएसएमई) उद्योगांना चालना मिळणार आहे.

मोठी गुंतवणूक करणारे उद्योग
उद्योग ................................ गुंतवणूक

- एण्ड्रेस- हाउजर विटझर- २०० कोटी
- एण्ड्रेस- हाउजर फ्लोटेक- १०० कोटी
- एण्ड्रेस- हाउजर ऑटोमोशन- ५० कोटी
- एंडूरेन्स टेक्नॉलॉजीस- १०० कोटी
- क्रायबायो एलएलपी- १०४.०३ कोटी
- श्रीनाथ ग्रुप- १०० कोटी
- पित्ती इंजिनिअरिंग- १५० कोटी
- संगज ग्रुप- ९० कोटी
- सोम आटो टेक- ५५ कोटी
एकूण- अन्य लहान- मोठे उद्योग मिळून २ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक

Web Title: Looking to the future! Industries in Aurangabad invest Rs 2,000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.