चौकात आता हायटेक कॅमेऱ्यांची नजर
By Admin | Updated: August 5, 2016 00:02 IST2016-08-05T00:00:07+5:302016-08-05T00:02:09+5:30
बापू सोळुंके, औरंगाबाद शहरातील गुन्हेगार व वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर आता हायटेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे.

चौकात आता हायटेक कॅमेऱ्यांची नजर
बापू सोळुंके, औरंगाबाद
शहरातील गुन्हेगार व वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर आता हायटेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचे अत्याधुनिक कॅमेरे हाँगकाँगमध्ये बसविण्यात आलेले आहेत. हैदराबादेतील एका कंपनीने स्वखर्चातून शहरातील तीन चौकांत हे कॅमेरे बसविले आहेत.
सेफ सिटी प्रकल्पांतर्गत औरंगाबाद शहरातील प्रमुख चौकांत आणि महत्त्वाच्या ठिकाणी ५२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. यातील सुमारे १२ सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. वारंवार बंद पडणाऱ्या या कॅमेऱ्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून संबंधित कंपनीसोबत सतत पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने विविध ठिकाणचे सुमारे १२ कॅमेरे बंद आहेत. कॅमेरे कार्यान्वित झाल्यापासून आठ महिन्यांत ते एकापाठोपाठ बंद पडत असल्याने या कॅमेऱ्यांच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
असे असताना हैदराबादस्थित एका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कंपनीतर्फे शहरातील तीन वेगवेगळ्या चौकांत प्रायोगिक तत्त्वावर २४ आधुनिक कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव सादर केला. आयुक्तांनी या कंपनीला शहरातील महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप), मुकुंदवाडी येथील पीव्हीआर वाहतूक सिग्नल, शहानूरमियाँ दर्गा अथवा आकाशवाणी चौक, यापैकी एक याप्रमाणे तीन चौकांत प्रत्येकी आठ कॅमेरे बसविण्यास परवानगी दिली आहे. कॅमेरे बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. १२ आॅगस्टपर्यंत या कॅमेऱ्यांचे लोकार्पण होईल.