लांब पल्ल्याच्या बसला खुलताबाद बसस्थानकाचे वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:06 IST2020-12-29T04:06:16+5:302020-12-29T04:06:16+5:30
खुलताबाद : येथील एस.टी.महामंडळाच्या बसस्थानकांत लांब पल्ल्याच्या बस येत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच या बसस्थानकात शौचालय, पिण्याचे ...

लांब पल्ल्याच्या बसला खुलताबाद बसस्थानकाचे वावडे
खुलताबाद : येथील एस.टी.महामंडळाच्या बसस्थानकांत लांब पल्ल्याच्या बस येत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच या बसस्थानकात शौचालय, पिण्याचे पाणी आदी सुविधा नसल्याने या बसस्थानकाचे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
खुलताबाद येथील बसस्थानकाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. आलेल्या प्रवाशांसाठी येथे कुठलीही सुविधा नाही. त्याचबरोबर बसस्थानकांतील रस्ता खराब झाल्याने नुसते धुळीचे लोळ उठत असतात. रात्री बेरात्री बसस्थानकांत बस आणली जात नसून बाहेरच बायबास घाटात प्रवाशांना उतरून जात आहेत. बसस्थानकात साक्री, नवापूर, नंदुरबार, अक्कलकुआ, शहादा, अंमळनेर, चाळीसगाव, इंदौर, सुरत आदी लांब पल्ल्याच्या गाड्या येत नसल्यानेे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांनी वारंवार निवेदने देऊनही या लांब पल्ल्याच्या बस खुलताबादचा थांबा घेत नसल्याने प्रवासी वैतागले आहेत. तसेच खुलताबाद बसस्थानकांत पाणी, शौचालय आदी व्यवस्था नसल्याचे वाहतूक नियंत्रक बी. एम. खाडे यांनी सांगितले. ही व्यवस्था न.प. करणार असल्याचे ते म्हणाले.
कोट---
असून अडचण, नसून खोळंबा
खुलताबाद हे धार्मिक व पर्यटनस्थळ असून या ठिकाणी सर्व बसला थांबा असूनही महामंडळाचे वाहक व चालक बसस्थानकात बस आणत नसल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. येथील बसस्थानकाची दुरुस्ती करून रंगरंगोटी करण्यात आली असली तरी शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. बसस्थानकातील रस्ता खराब झाला असून त्याचे डांबरीकरण करण्याची गरज आहे.
- मुनीबोद्दीन, नगरसेवक खुलताबाद .
कोट
बसस्थानक नावालाच
खुलताबाद येथील भद्रा मारुती तसेच विविध दर्ग्यांच्या दर्शनासाठी भाविक व महिला मोठ्या संख्येने येतात. मात्र, अनेकवेळा बसचे वाहक व चालक बसस्थानकांत बस न आणता बायपासवरील घाटातच प्रवाशांना उतरून देत असल्याने महिला व वृद्धांना त्रास सहन करावा लागतो. औरंगाबादहून सुटणाऱ्या सर्व बस खुलताबाद स्थानकात यायला हव्यात
- जयश्री श्रीकांत कुलकर्णी,खुलताबाद
फोटो कॅप्शन : खुलताबाद बसस्थानक परिसरातील रस्ता खराब झाल्याने अशी धूळ उडते.