लाँग कोर्स रेडिएशन' इतकेच 'शॉर्ट कोर्स रेडिएशन'ही फायदेशीर; ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांना आता फक्त ५ दिवसांचे रेडिएशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 07:19 IST2024-12-09T07:19:39+5:302024-12-09T07:19:46+5:30
शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) याची सुरुवातही झाली असून, शोधनिबंधातून याची मांडणीही करण्यात आली आहे.

लाँग कोर्स रेडिएशन' इतकेच 'शॉर्ट कोर्स रेडिएशन'ही फायदेशीर; ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांना आता फक्त ५ दिवसांचे रेडिएशन
- संतोष हिरेमठ
लोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर: ब्रेस्ट कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला सलग २५ ते २८ वेळेला किरणोपचार (रेडिएशन) घ्यावा लागतो. यासाठी किमान ५ ते ६ आठवडे लागतात. मात्र, आता अवघ्या ५ दिवसांत संपूर्ण ५ ते ६ आठवड्यांचा किरणोपचार घेणे शक्य झाले आहे. शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) याची सुरुवातही झाली असून, शोधनिबंधातून याची मांडणीही करण्यात आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. कैलाश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या शोधनिबंधासाठी आणि शॉर्ट कोर्स रेडिएशन'साठी किरणोपचारशास्त्र विभागप्रमुख डॉ. बालाजी शेवाळकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. पुनीता पंत, निवासी डॉक्टर प्राजक्ता चौधरी यांनी यासाठी प्रयत्न केले.
'२ ग्रे' ऐवजी '५.२ ग्रे' रेडिएशन किरणोपचार मोजण्यासाठी 'ग्रे' (जी.वाय.) हे एकक आहे. 'लाँग कोर्स रेडिएशन'मध्ये रुग्णाला प्रत्येक दिवशी '२ ग्रे इतके रेडिएशन दिले जाते, तर 'शॉर्ट कोर्स रेडिएशन मध्ये ५ दिवसांत प्रत्येक दिवशी '५.२ ग्रे किरणोपचार दिला जातो.
२० रुग्णांना ५ दिवसांचे रेडिएशन
ब्रेस्ट कॅन्सरमुळे छाती काढलेली असेल, तर २५ ते २८ आणि छाती वाचविलेली असेल, तर ३४ रेडिएशन घ्यावे लागते. पारंपरिक पद्धतीत म्हणजे 'लाँग कोर्स रेडिएशन'मध्ये ५ ते ६ आठवडे किरणोपचार घ्यावा लागतो. मात्र, 'शॉर्ट कोर्स रेडिएशन मध्ये अवघ्या ५ दिवसांत किरणोपचार दिला जातो.
व्यापक मान्यता रेडिओथेरपीमध्ये हायपोक्रॅक्शन म्हणजे पारंपरिक फ्रेंक्शनच्या तुलनेत कमी सत्रांमध्ये रेडिएशनच्या उच्च डोसचे वितरण हे ब्रेस्ट कार्सिनोमाच्या व्यवस्थापनात कार्यक्षम ठरते. सुरक्षितता आणि रुग्णांच्या सुविधेमुळे याला व्यापक मान्यता मिळाली आहे. - डॉ. प्राजक्ता चौधरी, निवासी डॉक्टर
रुग्णांची वेटिंग कमी होण्यास मदत 'शॉर्ट कोर्स रेडिएशन' हे ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. 'शॉर्ट कोर्स रेडिएशन'मुळे रुग्णांचे वेटिंग कमी होण्यासही मदत होईल. रुग्णांना कमी दिवस रुग्णालयात थांबावे लागेल. - डॉ. पुनीता पंत, सहयोगी प्राध्यापक, किरणोपचारशास्त्र विभाग, शासकीय कर्करोग रुग्णालय