लोकनेते मुंडे अनंतात विलीन

By Admin | Updated: June 5, 2014 00:13 IST2014-06-05T00:05:43+5:302014-06-05T00:13:07+5:30

प्रताप नलावडे, बीड अश्रूंना वाट मोकळी करुन देत आणि ‘साहेब परत या, तुम्ही परत या’ अशी भावनिक साद घालत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे या आपल्या लाडक्या नेत्याला

Lokneeta Munde merges with infinity | लोकनेते मुंडे अनंतात विलीन

लोकनेते मुंडे अनंतात विलीन

प्रताप नलावडे, बीड अश्रूंना वाट मोकळी करुन देत आणि ‘साहेब परत या, तुम्ही परत या’ अशी भावनिक साद घालत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे या आपल्या लाडक्या नेत्याला बुधवारी दुपारी लाखो कार्यकर्त्यांनी अखेरचा निरोप दिला. परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात मुंडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्यभरातून आलेले त्यांचे कार्यकर्ते आणि चाहत्यांसह राज्यातील आणि केंद्रातील विविध पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते. गोपीनाथराव यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल ज्या ठिकाणी मंगळवारी सत्कार करण्यात येणार होता, त्याच परिसरात त्यांना अखेरचा निरोप देण्याची दुर्दैवी वेळ कार्यकर्त्यांवर आली. दुपारी १ वाजून ४७ मिनिटांनी कारखान्याच्या आवारात खास तयार करण्यात आलेल्या चबुतर्‍यावर गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवाला आमदार पंकजा पालवे यांनी वैदिक मंत्रघोषात मुखाग्नी दिला. एका विशेष विमानाने मुंडे यांचे पार्थिव आज सकाळी लातूरला आणण्यात आले. तेथून भारतीय वायू सेनेच्या खास विमानाने परळी येथे पार्थिव आणले गेले. विमानतळापासून एक किलोमीटर अंतरावर अंत्यदर्शनासाठी खास फुलांनी सजविलेल्या चौथर्‍यावर पार्थिव ठेवण्यात आले. यावेळी पार्थिवासोबत त्यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे, मुलगी आमदार पंकजा पालवे, प्रीतम आणि यशश्री तसेच विरोधी पक्षनेते विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस होते. पार्थिव पाहून उपस्थितांना भावना अनावर झाल्या. लोक आक्रोश करीत होते. एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होते. आपला लाडका नेता आपल्यातून गेला यावर जणू ते विश्वास ठेवायलाच तयार नव्हते. मुंडे यांची छायाचित्रे उंचावत कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे अमर रहेच्या घोषणा देत होते. ‘साहेब, तुम्ही परत या’अशी भावनिक सादही घालत होते. ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाचा धक्का सहन न झालेल्या कार्यकर्त्यांनी बुधवारी अंत्यसंस्कारासाठी आलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना मारहाण केली़ तसेच मंत्र्यांच्या गाड्या अडवून दगडफेक करीत मुंडेंच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली़जमलेल्या कार्यकर्त्यांनी मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करण्यास सुरूवात केली. अंत्यदर्शनासाठी जे नेते येत होते, त्यांच्याकडे पाहून कार्यकर्ते अशी मागणी करीत होते. याचवेळी नितीन गडकरी यांच्या विरोधातही घोषणाबाजी सुरू होती. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि खासदार रामदास आठवले यांनी सीबीआय चौकशी करण्यात येईल आणि यासंदर्भात आपण पंतप्रधानांशी बोलू, असे उपस्थितांना सांगत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.देशभरातून आणि संपूर्ण राज्यातून लाखोंचा ‘नाथ’ सागर कारखाना परिसरात आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जमला होता. पहाटेपासूनच परळीकडे जाणार्‍या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली होती. लोक जमेल त्या वाहनाने येत होते. लोकांना बसण्यासाठी तीन मोठे शामियाने उभारण्यात आले होते. मुखाग्नी देण्यासाठी खास चबुतरा बांधण्यात आला होता आणि त्याच्या बाजूलाच व्हीआयपी लोकांना आणि कुटुंबातील लोकांना बसण्यासाठी एक वेगळा शामियाना होता. यावेळी पंकजा पालवे यांनी माईक हातात घेतला आणि लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला साहेबांची शपथ आहे, तुम्ही शांत राहा, असे आवाहन केल्यानंतर दगडफेक थांबली. त्यानंतर दर्शनासाठी लोकांनी गर्दी केली. एक तास हे अंत्यदर्शन सुरू होते. त्यानंतर खासदार पूनम महाजन यांनी आता अंत्यसंस्कार सुरू होणार आहेत, असे सांगितले. त्यानंतर तिरंग्यात गुंडाळून पार्थिव फुलांनी सजविलेल्या चबुतर्‍याकडे नेण्यात आले. यावेळी जवानांनी मुंडे यांना २१ फैरी हवेत झाडून अखेरची मानवंदना दिली. जड अंत:करणाने चाहत्यांची पावले घराकडे वळली. दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान पाच लाख लोकांपेक्षाही अधिक लोक कारखाना स्थळावर जमले होते. लोकांची गर्दी वाढत गेली तशी तेथे असलेली यंत्रणाही कोलमडून पडली. लोकांना आवरणे पोलिसांना अशक्य झाले. पार्थिव जेव्हा अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले, त्यावेळी तर लोकांनी शामियान्याकडे अक्षरश: धाव घेण्यास सुरूवात केली. लोकांना आवरण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला तेव्हा लोकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली.

Web Title: Lokneeta Munde merges with infinity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.