लोकमत इफेक्ट : नागसेनवन परिसरातील वसतिगृह दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात २ कोटीची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 16:35 IST2018-03-09T16:31:17+5:302018-03-09T16:35:03+5:30
संस्थेकडे निधी उपलब्ध नसल्याने संस्थेने निधीसाठी महाविद्यालयामार्फत शासन दरबारी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावरून शासनाने आज अर्थसंकल्पात २ कोटी रुपयाची तरतूद केली.

लोकमत इफेक्ट : नागसेनवन परिसरातील वसतिगृह दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात २ कोटीची तरतूद
औरंगाबाद : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नागसेनवन परिसरातील वसतिगृहाची दुरावस्था ही केवळ निधी उपलब्ध नसल्याने झाली आहे. संस्थेकडे निधी उपलब्ध नसल्याने संस्थेने निधीसाठी महाविद्यालयामार्फत शासन दरबारी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावरून शासनाने आज अर्थसंकल्पात २ कोटी रुपयाची तरतूद केली. या वसतिगृहाच्या अवस्थेवर ' लोकमत ' ने सर्वात प्रथम प्रकाश टाकला होता.
बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या दुरुस्तीसाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीने शासनाकडे निधीची मागणी केली होती. यावर २६ में २०१७ ला समाजकल्याण आयुक्तांनी महाविद्यालयाला पत्र पाठवून रीतसर प्रस्ताव पाठवण्याचे सूचित केले होते. यानुसार महाविद्यालयाने प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे दाखल केला होता. या सोबतच अजिंठा वसतिगृह व मिलिंद सभागृहासाठीच्या दुरुस्तीसाठीसुद्धा निधीची मागणी करणारा प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला होता. यावर शासनाने सकारात्मक पाऊल उचलत आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात २ कोटीच्या निधीची तरतूद केली. यामुळे नागसेनवन परिसरातील वसतिगृहात मुलभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत मिळेल.
'लोकमत' ने येथील वसतिगृहाच्या दुरावस्थेकडे नोव्हेंबर -१७ मध्ये सर्वात प्रथम व त्यानंतर डिसेंबर -१७ मध्ये वृत्त प्रकाशितकरून लक्ष वेधले होते. त्यानंतर या वृत्तांची दखल घेत विविध समाजसेवक, सामाजिक, राजकीय व विद्यार्थी संघटना आणि संस्थेतील कर्मचारी यांनी लोकसहभागातून वसतिगृहात सुविधा पुरवण्यासाठी तयारी दर्शवली होती.