Lok Sabha Election 2019 : मी निवडणुक लढणार; आणि खैरेंना पाडणार : हर्षवर्धन जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 18:49 IST2019-03-23T15:18:44+5:302019-03-23T18:49:20+5:30
काँग्रेसची उमेदवारी खा.खैरेंनी मॅनेज करून आणल्याचा केला आरोप

Lok Sabha Election 2019 : मी निवडणुक लढणार; आणि खैरेंना पाडणार : हर्षवर्धन जाधव
औरंगाबाद : काँग्रेसच्या वाटेवर जाऊन निराश होऊन परतलेले शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे संस्थापक आ.हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची आज (दि.२३ ) शनिवारी घोषणा केली. शिवसेनेचे खा.चंद्रकांत खैरे यांना पाडण्यासाठीच निवडणुक लढणार असल्याचे स्पष्ट करीत जाधव यांनी काँग्रेसची उमेदवारी नाडी-पुडीने (खा.खैरेंनी) मॅनेज करून आणल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला.
काँग्रेसचे उमेदवार आ.सुभाष झांबड यांच्यापेक्षा माझी उमेदवारी उजवी होती. काँग्रेसने प्रबळ उमेदवार म्हणून माझा विचार करावयास हवा होता. विद्ममान खासदाराने यामध्ये काहीतरी जादू केल्याची शंका येत आहे. इतर पक्षांचे उमेदवार खैरे ठरवू लागलेत, असे वाटू लागले आहे. खैरेंना वाचविण्यासाठी सर्वांची भूमिका असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांना रोखण्यासाठी आणि हा जिल्हा खैरेमुक्त करण्यासाठी ३० मार्च रोजी दुपारी १ वा. उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा जाधव यांनी केली.
निवडून आल्यास मोदींना पाठिंबा
मधल्या काळात माझ्या विचारांशी तह करून काँग्रेसच्या दारी गेलो होतो. परिवर्तनासाठी कॉंग्रेस साथ देईल, असे वाटले होते. परंतु काँग्रेसने परिवर्तनाचा काही विचारच केलेला दिसत नाही. मी वैयक्तिक विचाराने कालही मोदींसोबत होतो आणि आजही आहे. निवडून आल्यानंतर मोदींना पाठींबा देईल असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.