तेलघणा शाळेला आठ दिवसांपासून कुलूप
By Admin | Updated: June 23, 2014 23:50 IST2014-06-23T23:50:15+5:302014-06-23T23:50:15+5:30
घाटनांदूर: आरटीई नुसार सर्वांना शिक्षण सक्तीचे करण्यात आले असले तरी त्यातील तरतुदी कठोर असतानाही तो कायदा धाब्यावर बसविण्याचा प्रकार घाटनांदूर आणि परिसरात होत आहे.

तेलघणा शाळेला आठ दिवसांपासून कुलूप
घाटनांदूर: आरटीई नुसार सर्वांना शिक्षण सक्तीचे करण्यात आले असले तरी त्यातील तरतुदी कठोर असतानाही तो कायदा धाब्यावर बसविण्याचा प्रकार घाटनांदूर आणि परिसरात होत आहे. शाळा सुरु होऊनही आठ दिवसांचा कालावधी उलटला असला तरी घाटनांदूरजवळील तेलघणा शाळेचे कुलूप अद्याप उघडलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
घाटनांदूर केंद्रांतर्गत असलेल्या तेलघणा येथील जि. प. शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. एस. एस. चव्हाण या एकट्या महिला कर्मचाऱ्यावर शाळेचा कारभार चालतो. या शाळेवर नियुक्त करण्यात आलेली दुसरी शिक्षिका चंद्रकला भारती या दोन वर्षापासून प्रतिनियुक्तीवर वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत. उन्हाळी सुट्टया संपल्यानंतर १६ जून रोजी शाळा सुरु होणे अपेक्षित होते. मात्र घाटनांदूर केंद्रांतर्गत येणाऱ्या तेलघना शाळेचे कुलूप अद्याप न उघडण्याचा प्रताप येथे दिसून येत आहे. एस. एस. चव्हाण या रजेवर असल्याने गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तेलघना शाळेवर नियुक्त असलेल्या दुसऱ्या शिक्षिका चंद्रकला भारती यांना जा. क्र. २७५/१४ दि. १० जून २०१४ या आदेश पत्रान्वये जि. प. शाळेवर रुजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र सदरील शिक्षिकेने गट शिक्षणाधिकाऱ्यांचे लेखी आदेश धाब्यावर बसवत शाळेकडे अद्यापही फिरकलेले नाहीत. शिक्षिकांच्या या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भारती या २०१२-१३ मध्ये गट शिक्षणाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे प्रतिनियुक्तीवर होत्या. १३-१४ या वर्षात अंबासाखर जि. प. केंदांतर्गत तहसील कार्यालय, अंबाजोगाई, रविवार पेठ केंद्र, अंबाजोगाई, मांडवा जि. प. शाळा आदी ठिकाणी प्रतिनियुक्तीवर कार्यरत होत्या. अंबाजोगाईचे तहसीलदार ९ जून रोजी कार्यमुक्त केले तर गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने १० जूनच्या लेखी पत्रान्वये तेलघना जि. प. शाळेवर रुजू होण्याचे आदेश दिले. मात्र आदेश धाब्यावर बसवून सदरील शिक्षिका अद्याप शाळेकडे फिरकलीच नाही.
शाळा सुरु होण्याअगोदर शिक्षकांनी शाळेत येऊन शाळेचा परिसर पाहणी करुन स्वच्छ करणे अपेक्षित असते. मात्र अद्यापही शाळेकडे शिक्षकच फिरकले नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांच्या तक्रारीवरुन गट शिक्षणाधिकारी बावणे व केंद्रप्रमुख स्वामी यांनी शाळेला भेट देऊन तात्पुरता शिक्षक देण्याचा घाट घातला होता. मात्र बाबासाहेब सिरसाट यांच्यासह इतर शिक्षकांनी कायमस्वरुपी शिक्षक देण्याची मागणी केल्याने अद्यापही शाळेला कुलूपच आहे. गैरहजर शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याबाबत शिक्षणाधिकारी देवगुडे यांनी सांगितले की, हा प्रकार भयंकर असून आरटीई अॅक्टनुसार प्रतिनियुक्ती देता येतच नाही. वेतन अदा करता येत नसल्याचे संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्याचे संकेत दिले.
गट शिक्षणाधिकारी बावणे व केंद्रप्रमुख स्वामी म्हणाले की, शाळा न उघडणे हा गुन्हा असून संबंधित शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करणार आहोत. (वार्ताहर)