लॉकडाऊनमुळे ‘डीएमआयसी’च्या विकासाला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:04 IST2021-05-15T04:04:57+5:302021-05-15T04:04:57+5:30

औरंगाबाद : गेल्या वर्षापासून सतत दोन वेळा लागलेल्या लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहतीत (डीएमआयसी) विकास कामांबरोबर गुंतवणुकीची प्रक्रियाही थांबली ...

Lockdown hampers development of DMIC | लॉकडाऊनमुळे ‘डीएमआयसी’च्या विकासाला खीळ

लॉकडाऊनमुळे ‘डीएमआयसी’च्या विकासाला खीळ

औरंगाबाद : गेल्या वर्षापासून सतत दोन वेळा लागलेल्या लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहतीत (डीएमआयसी) विकास कामांबरोबर गुंतवणुकीची प्रक्रियाही थांबली आहे. मागील तीन-चार वर्षांपासून या औद्योगिक वसाहतीत उद्योगांना प्लॉट देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या ठिकाणी पुरेशा प्रमाणात गुंतवणूक व्हावी, यासाठी अलीकडच्या काळात मार्केटिंग करण्यास उद्योग विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सुमारे दहा हजार एकर क्षेत्र असलेल्या ‘डीएमआयसी’मध्ये शेंद्रा औद्योगिक पट्ट्यात (ऑरिक सिटी) ‘ह्योसंग’, पर्किन्स या मोठ्या उद्योगांसह १०-१२ उद्याेगांचे उत्पादनही सुरू झाले आहे. अलीकडेच स्टील उद्योगातील अग्रगण्य रशियन कंपनी ‘नोव्होलिपटेस्क’ (एनएलएमके) व फ्यूजी सिल्व्हर टेक या उद्योगांसह ६१ उद्योगांना जागा हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे बिडकीन औद्योगिक पट्ट्यात पायाभूत सुविधांची बऱ्यापैकी कामे झाली आहेत, परंतु तेथे अद्याप एकही अँकर प्रोजेक्ट आलेला नाही.

बिडकीन औद्योगिक पट्ट्यात ‘फूडपार्क’ उभारण्यासाठी ‘औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाउनशिप लिमिटेड’च्या (एआयटीएल) संचालक मंडळाने पाच महिन्यांपूर्वीच मान्यता दिली. त्यानंतर, अन्नप्रकिया उद्योगांशी संबंधित देश-विदेशातील उद्योगांना निमंत्रित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. दरम्यानच्या कालावधीत देश-विदेशात कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने ही प्रक्रिया पुन्हा थांबली. लॉकडाऊनमुळे ‘डीएमआयसी’तील गुंतवणुकीबाबत मार्केटिंग करण्यास अडचणी येत आहेत, असे ‘एआयटीएल’चे सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी सांगितले.

शेंद्रा औद्योगिक वसाहतीजवळून समृद्धी महामार्गाची ‘डीएमआयसी’ला कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रस्तावही ‘एमआयडीसी’ संचालक मंडळाने मंजूर केला. त्यानुसार, ‘एमएसआरडीसी’ला जवळपास ४१ कोटी रुपयांचा निधीही हस्तांतरित करण्यात आला. मात्र, भूसंपादनासाठी शेतकऱ्यांसोबत लॉकडाऊनमुळे बैठका घेता येत नाहीत. काही शेतकरी दामदुप्पट भावाने जमिनी देण्यासाठी अडून बसले आहेत. त्यांच्यासोबत तडजोड करण्यासाठी बैठका घेता येत नाहीत. त्यामुळे कनेक्टिव्हिटीचेही काम रखडले आहे, असे काटकर यांचे म्हणणे आहे.

चौकट....

लॉकडाऊन उठल्यानंतर प्रक्रिया गतीने

‘डीएमआयसी’मध्ये गुंतवणूक करण्यास देश-विदेशातील उद्योगांना निमंत्रणे दिली आहेत, पण कोरोनामुळे गेल्या वर्षापासून प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन पाहणी करण्यासाठी उद्योजकांना अडचणी येत आहेत. आताही लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया ठप्प झाली आहे. फूडपार्कबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला. त्याबाबत हालचाली गतिमान झाल्या होत्या, पण आता त्याही मध्येच थांबल्या. लॉकडाऊन उठताच, येथे गुंतवणूक वाढविण्याच्या सर्व प्रक्रिया आम्ही पुन्हा त्याच गतीने पार पाडू, असे संजय काटकर यांनी सांगितले.

Web Title: Lockdown hampers development of DMIC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.