स्थानिक प्रश्नांना हुलकावणी !
By Admin | Updated: October 5, 2014 00:49 IST2014-10-05T00:35:15+5:302014-10-05T00:49:40+5:30
संजय तिपाले , बीड पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी जिल्हा दौऱ्यावर होते़ ते काय बोलणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे कान टवकारले होते़ ऊसतोड मजूर, रेल्वे या जिल्ह्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर ते ठोस

स्थानिक प्रश्नांना हुलकावणी !
संजय तिपाले , बीड
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी जिल्हा दौऱ्यावर होते़ ते काय बोलणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे कान टवकारले होते़ ऊसतोड मजूर, रेल्वे या जिल्ह्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर ते ठोस आश्वासन देतील, अशी अपेक्षा होती़ अर्ध्या तासाच्या भाषणात मोदी यांनी राज्य ते जागतिक स्तरावरील प्रश्नांचा उहापोह केला;परंतु स्थानिक प्रश्नांना बगलच दिली़ त्यामुळे ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ ही अपेक्षा बाळगणाऱ्या बीडकरांचा अपेक्षाभंग झाला़
लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारानिमित्ताने पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच बीडला आले होते़ ‘अच्छे दिन आने वाले हैं’ चा नारा देत ज्या मोदींनी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देश ढवळून काढला ते मोदी बीडच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काय बोलतात? याची सर्वांनाच उत्सुकता होती़
‘भाईयों और बहनों़़़’ अशी साद घालत मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली़ ‘गोपीनाथ मुंडेसे मेरा ३० सालसे गहेरा संबंध था़़़ लोगोंका कल्याण करनेवाला गोपीनाथ मेरा छोटा भाई था़़’ अशी कृतज्ञ भावनाही त्यांनी व्यक्त केली़ त्यानंतर त्यांनी राज्यातील आघाडी सरकारवर सडकून टीका केली़ आघाडी सरकारने तुम्हाला १५ वर्षांत काय दिले? असा सवाल उपस्थित करुन त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर शरसंधान साधले अन् नेहमीच्याच ‘स्टाईल’ मध्ये सभेवर छाप सोडली़
पुढे महाराष्ट्र व गुजरातच्या विकासाची तुलना केली़ विकासात महाराष्ट्राला गुजरातच्याही पुढे नेऊन ठेवणार अशी ग्वाही त्यांनी दिली खरी;परंतु सर्वाधिक ऊसतोड मजुर व कापूस उत्पादनात अग्रेसर असलेल्या बीड जिल्ह्याला त्यांनी कुठलेच ठोस आश्वासन दिले नाही़
दरम्यान, मोदी यांनी भाषणाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राला काय दिले? याचा लेखाजोखा मांडला़ औरंगाबादला जपानच्या मदतीने उद्योग, चीनच्या सहाय्याने औद्योगिक पार्क, मुंबई ते अहमदबाद जलदगती रेल्वे, मुंबई व शांघायमध्ये विकासासाठी करार, ५०० शहरांमध्ये पाण्याची योजना या बाबींचा उल्लेख केला; परंतु स्थानिक प्रश्नाला थेट हात घालण्याचे त्यांनी टाळले़
जानकरांच्या चिठ्ठीनंतर मोदींचा रेल्वेप्रश्नाला ‘दे धक्का’
४उसतोड मजुरांचे स्थलांतर, विमा, रोजगार या प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांनी चकार शब्दही काढला नाही़ शिवाय दुष्काळ, सिंचन, कापूस प्रक्रिया उद्योगाचा अभाव यावरही ते बोलले नाहीत़
४मोदी भाषण उरकरण्याच्या तयारीत असतानाच रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी त्यांच्याकडे चिठ्ठी सरकवली़ त्यानंतर मोदी यांनी ‘...और रेल्वे का सपना भी तो पुरा करना है’ अशा एका वाक्यात रेल्वेचा विषय गुंडाळला आणि ‘दे धक्का’ देत बीडकरांचा निरोप घेतला़
४बीडकरांनी वर्षानुवर्षे पाहिलेल्या रेल्वेच्या स्वप्नाला मोदींनी केवळ एका वाक्यात उरकल्याने हिरमोड झाला़
४विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात ‘यहाँ के लोग गन्ना काटते है़ मैने पिता और यहाँ की जनता ने नेता खो दिया है़ ये जनता अब आपके हवाले है़’ असे सांगून मोदींचे उसतोड मजूरांकडे लक्ष वेधले होते़
४या उपरही पंतप्रधान मोदी यांनी हा विषय भाषणात घेण्याचे टाळले़
जिल्ह्यातील समस्या व इथल्या प्रश्नांची गोपीनाथराव मुंडे यांना खडान्खडा माहिती होती़ हे प्रश्न श्रेष्ठींकडे मांडून ते सोडविण्याची त्यांची हातोटी होती़
४देशाचे पंतप्रधान बीड जिल्ह्यात आले असताना त्यांच्या समोर जिल्ह्यातील रेल्वे, उसतोड मजूर, सिंचन, औद्योगिक विकास, बेरोजगारी या प्रश्नांचा डांगोरा अत्यंत खुबीने स्व़ मुंडे यांनी पिटला असता आणि बहुतांश प्रश्नांवर न्यायही मिळवला असता़
४मोदींना भाषणाच्या शेवटी रेल्वेवर बोला या संदर्भात चिठ्ठी देण्याची वेळ आल्याने त्यांना या विषयावर बोलायचे होते की नाही असाही प्रश्न निर्माण झाला़