सावकाराकडील कर्जास माफी
By Admin | Updated: September 10, 2015 00:30 IST2015-09-10T00:26:33+5:302015-09-10T00:30:25+5:30
उस्मानाबाद : कर्जदार शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज शासनामार्फत भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

सावकाराकडील कर्जास माफी
उस्मानाबाद : कर्जदार शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज शासनामार्फत भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संबंधित माहिती संबंधित परवानाधारक सावकारांकडे दाखल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
कर्जदार व्यक्ती हा पगारदार, निवृत्तीवेतन धारक, मुंबई दुकाने व अस्थापना अधिनियम १९४८ नुसार परवानाधारक नसावा. निव्वळ शेतकरी कर्जदारांसाठी ही योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेस पात्र शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा, कुटुंबातील अन्य व्यक्तींनी कर्ज घेतले असल्यास शिधापत्रिकांची छायांकित प्रत, छायाचित्र असलेल्या शासनमान्य ओळखपत्राची प्रत ही कागदपत्रे सावकाराकडे द्यावयाची आहेत. यासोबतच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित सहाय्यक निबंधकांना हमीपत्रही द्यावयाचे आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित सावकारांनी कागदपत्रे स्वीकारली नाहीत तर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रासह जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयात अर्ज करावा. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक विभागातही यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात आल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.