सेतू सुविधा केंद्रावर भार !
By Admin | Updated: August 14, 2014 01:57 IST2014-08-14T01:36:12+5:302014-08-14T01:57:08+5:30
लातूर : महसूल कर्मचाऱ्यांचा संप मिटताच तहसीलमध्ये गर्दी वाढली आहे. सेतू सुविधा केंद्रावर तर अतिरिक्त भार पडला असून, प्रमाणपत्रांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी रांगा लागल्या आहेत.

सेतू सुविधा केंद्रावर भार !
लातूर : महसूल कर्मचाऱ्यांचा संप मिटताच तहसीलमध्ये गर्दी वाढली आहे. सेतू सुविधा केंद्रावर तर अतिरिक्त भार पडला असून, प्रमाणपत्रांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. दर रोज शे-दोनशे प्रस्ताव दाखल होत आहेत.
मागच्या आठवड्यात तहसीलदारांसह नायब तहसीलदार व महसूलचे कर्मचारी संपावर होते. त्यामुळे जात प्रमाणपत्रांचे प्रस्ताव घेणे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. ६ आॅगस्टपर्यंत सर्वच तहसील कार्यालयातील कामकाज बंदच होते. त्यामुळे नव्याने आरक्षण मिळालेल्या मराठा व मुस्लिम समाजाच्या प्रमाणपत्रांची प्रक्रिया थांबली होती. अनेकांनी प्रस्ताव तयार करून ठेवले होते. परंतु, स्वीकारणे बंद असल्यामुळे गैरसोयच झाली. आता तयार प्रस्ताव दाखल करण्यास तहसीलच्या सेतू सुविधा केंद्रात झुंबड उडाली आहे. दररोज विविध जातीचे चार-पाचशे प्रस्ताव दाखल केले जात आहेत.
चार दिवसांच्या मुदतीनंतर या प्रस्तावाची छाननी करून प्रमाणपत्र वितरण केले जात आहे. त्यामुळे तहसीलचे सेतू सुविधा केंद्र हाऊसफुल्ल झाले आहे. सुविधा केंद्रातील तसेच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर सेतू केंद्रातील अतिरिक्त भार देण्यात आला आहे. शक्य तितक्या लवकर प्रमाणपत्र देण्यासाठी तहसील प्रशासन प्रयत्न करीत आहे. (प्रतिनिधी)
तीन आरक्षण असलेल्या सर्वच जातींना प्रवेशासाठी जात प्रमाणपत्राची अट आहे. सध्या तंत्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया (पॉलिटेक्निक) सुरू असल्याने सेतूमध्ये गर्दी वाढली आहे. प्रवेश निश्चित करण्यासाठी प्रमाणपत्रांचा अडसर ठरू नये म्हणून पालक, विद्यार्थी तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात तळ ठोकून आहेत. मागील आठवड्यातील संपामुळे गैरसोय झाली होती. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी तंत्रशिक्षणाच्या संचालकांना पत्र पाठवून प्रमाणपत्रांसाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती केली होती. तत्पूर्वीच संप मिटल्याने प्रवेश निश्चित होत असलेल्या विद्यार्थ्यांना १५ आॅगस्टपूर्वी प्रमाणपत्र देण्यासाठी गतीने कामाला लागले आहे.