शाळांना जीवदान
By Admin | Updated: June 29, 2014 00:24 IST2014-06-29T00:07:14+5:302014-06-29T00:24:06+5:30
सुनील चौरे, हदगाव तालुक्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या २४ शाळा बंद होण्याच्या मार्गावर होत्या तसा प्रस्ताव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जि.प.कडे पाठविला होता.

शाळांना जीवदान
सुनील चौरे, हदगाव
तालुक्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या २४ शाळा बंद होण्याच्या मार्गावर होत्या तसा प्रस्ताव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जि.प.कडे पाठविला होता. परंतु सदरच्या परिपत्रकाला बुधवारी शासनाने स्थगिती दिल्यामुळे २४ शाळा बंद होण्याचे व ४१ शिक्षक अतिरिक्त ठरण्याचे संकट सध्यातरी टळले आहे.
तालुक्यात प्रा. शाळा हुलकाणे तांडा १२, (ल्हाहरी) वस्तीशाळा कोहळी-१५, प्रा. शाळा मनुला (खु) १८, प्रा. शाळा बेलगव्हाण १०, प्रा.ज्ञा. शिवपुरी १७, प्रा. शाळा निमटोक-१४, प्रा.शाळा पोतलीतांडा १५ वस्तीशाळा विठ्ठलवाडी-१९, नवरदेववाडी वस्तीशाळा १७, जांभळसवली १७, रामबापु वस्ती शाळा १२, प्रा. शाळा पिंपराळा १८, वस्तीशाळा इंद्रप्रस्थनगर, तामसा-१६, प्रा. शाळा लोहा (लहानतांडा) १२, प्रा. शाळा शेट्टीवाडी ३, वाकी बु. तांडा १९, वस्तीशाळा पिंपळगाव तांडा १९, प्रा. शाळा नाईकतांडा ११, प्रा. शाळा देशमुखवाडी १६, प्रा.शा. केशरनाईक तांडा ८, प्रा. शाळा खांडेश्वरनगर ५, सायलवाडी मोठा तांडा ८, देशमुखवाडी १६ इत्यादी तालुक्यातील १९३ केंद्रांपैकी १० केंद्रातील पहिली ते चौथी वर्गाची ही विद्यार्थी पटसंख्या आहे. एकूण ३२१ विद्यार्थ्यांसाठी आरटीई नियमाप्रमाणे ४८ शिक्षकांची आवश्यकता आहे, परंतु येथे ४१ शिक्षक कार्यरत आहे.
या प्रकारांना आळा घालण्यासाठी शाळा बंद नाही केल्या तरी अतिरिक्त शिक्षकांना इतरत्र शाळावर पाठवता येते. या शाळा सुरू ठेवण्यासाठी कमीत कमी २० पटसंख्या असावी असा जीआर आहे. त्याप्रमाणे या शाळांना इतरत्र जावून विद्यार्थ्यांना वर्षाकाठी ३ हजार रुपये वार्षिक प्रवास भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला. ३ किंवा ५ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना उत्साह येणार नाही. दोन्ही शिक्षक शाळेवर उपस्थित राहण्याचे कारण नाही. संबंधित कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन घरी बसून पगार उचलण्याचे प्रकारही हदगाव तालुक्यात येथे घडले आहेत.
याविषयी गटशिक्षणाधिकारी बी.आय. येरपुलवार यांच्याशी चचार केलीे असता, धक्कादायक माहिती समोर आली. राजकीय दबाव आणून या शाळा बंद करु दिल्या नाहीत. शिक्षकाची संख्या घटू दिली नाही व विद्यार्थीसंख्याही वाढवली नाही, असे कळाले. परंतु जून २०१४ मध्ये या २४ शाळापैकी जिथे १० च्या खाली पटसंख्या आहे. त्या शाळा बंद करण्याचा प्रस्ताव जि. प. नांदेडच्या शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले व अतिरिक्त शिक्षकांना इतरत्र शाळांत स्थलांतर करण्यात आले.
३ किंवा ५ विद्यार्थ्यांसाठी शासन महिन्याकाठी २ शिक्षकावर ५० हजार रुपये खर्च करते. त्यांचा निकाल काय? या उलट याच तालुक्यात अनेक शाळेत पटसंख्या ४०-५० एका वर्गाची आहे. तिथे शिक्षकसंख्या कमी आहे. हा फरक आतापर्यंत वरिष्ठांच्या लक्षात कसा आला नाही हे कोडेच आहे. २० नोव्हेंबर २०१३ विद्यार्थी पटसंख्या जीआरला स्थगिती दिली असली तरी १० पटसंख्या असलेल्या शाळांना यामध्ये सूट नसल्याचे बीओनी सांगितले.
२५ विद्यार्थ्यांसाठी १ शिक्षक आवश्यक
२५ विद्यार्थ्यांसाठी १ शिक्षक आवश्यक आहे. परंतु येथे चित्र वेगळे आहे. या २४ शाळांत २० पेक्षा कमी पटसंख्या असूनही शिक्षकसंख्या २ आहे तर आष्टी केंद्राअंतर्गत प्रा. शाळा शेट्टेवाडी येथे फक्त ३ विद्यार्थी असून तिथे २ शिक्षक कार्यरत आहेत. निमगाव केंद्राअंतर्गत प्रा.शा. नाईकतांडा ११ विद्यार्थी दोन शिक्षक प्रा.शा. केशरनाईक तांडा ८ विद्यार्थी २ शिक्षक प्रा.शा. खांडेश्वर ५ विद्यार्थी २ शिक्षक, सायलवाडी मोठा तांडा ८ विद्यार्थी २ शिक्षक असा भोंगळ कारभार सुरू आहे.