वाहक -चालकाच्या सतर्कतेमुळे जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:33 IST2017-07-19T00:14:41+5:302017-07-19T00:33:36+5:30
हिंगोली : बस प्रवासात एका प्रवाशाच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. मात्र बसमधील वाहक व चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी रूग्णावर तत्काळ उपचार करता आले.

वाहक -चालकाच्या सतर्कतेमुळे जीवदान
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : बस प्रवासात एका प्रवाशाच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. मात्र बसमधील वाहक व चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी रूग्णावर तत्काळ उपचार करता आले. चालक ब्रम्हाजी मुंढे व वाहक माधव चमकुरे यांच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी धोत्रे यांना जीवदान मिळाले.
हिंगोली तालुक्यातील गुगुळपिंपरी येथील भिकाआप्पा जानोजी धोत्रे (६५) हिंगोली बस्थानकावरून अकोला-कंधारकडे जाण्यासाठी बसमध्ये बसले होते. बस जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली होती. यावेळी वाहक माधव चमकुरे तिकीट काढण्यासाठी गेले असता त्यांनी धोत्रे यांना तिकिटाची विचारणा केली. यावेळी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे लक्षात आले. सदर बाब वाहकाने चालकाच्या लक्षात आणून देताच बस वळवून परत आगारात आणली. यावेळी आगारातर्फे ही बस पोलीस ठाण्यात नेण्यास सांगण्यात आले. तेथे गेल्यानंतर सदर बस रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर बस थेट रुग्णालयात आणण्यात आली. सदर घटनेची माहिती डॉक्टरांना सांगितली. परंतु डॉक्टर उपचार लवकर करत नव्हते, असे लक्षात येताच बसमधील एका प्रवाशाने धोत्रे यांच्यावर आधी उपचार करा, बाकी कार्यवाहीचे नंतर पाहू असे म्हणताच डॉक्टरांनी उपचारास सुरूवात केली. यावेळी धोत्रे यांच्या नातेवाईकांशी मोबाईलवरून संपर्क केला. काही वेळातच नातेवाईक रुग्णालयात आले. परंतु धोत्रे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविले. घटनेप्रकरणी जमादार थिटे यांनी पोलिसांत नोंद केली आहे.