वीज प्रवाहित तार तुटून पडली रस्त्यावर; नागरिकांच्या दक्षतेने मोठा अनर्थ टळला
By साहेबराव हिवराळे | Updated: July 25, 2024 16:22 IST2024-07-25T16:22:19+5:302024-07-25T16:22:30+5:30
साताऱ्यात अनर्थ टळला, फ्यूज कॉल सेंटरला तारा तुटल्याचे अनेक फोन

वीज प्रवाहित तार तुटून पडली रस्त्यावर; नागरिकांच्या दक्षतेने मोठा अनर्थ टळला
छत्रपती संभाजीनगर : सातारा भागातील पेशवेनगर परिसर... मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजेची शाळा सुटण्याची वेळ... अन् तितक्यात विजेचा प्रवाह असलेली तार तुटून रस्त्यावर पडली... सुदैवाने दक्ष नागरिकांनी लगेच महावितरणला कळवल्याने अनर्थ टळला.
वीज सुरळीत ठेवणे हे काम फक्त महावितरणचे नसून, त्यांनी जे सबकाॅन्ट्रॅक्ट दिलेले आहे, त्या एजन्सींना ही मान्सूनपूर्व कामे सोपवलेली आहेत. वीज गेल्यावर महावितरणची यंत्रणा धावून आली नाही तर वरिष्ठांना आणि टोल फ्री नंबरवर तक्रार करण्याची सोय महावितरणने केली आहे.
विजेच्या तारा तुटण्याचा प्रकार चिकलठाणा औद्योगिक परिसर व निवासी वसाहतीत सातत्याने घडत आहे. शहरातील इतरही निवासी वसाहतीत असलेल्या झाडांची छाटणी न होणे, डीपी भोवती झाडांचा वेटोळा ही वीज जाण्याची प्रमुख कारणे आहेत.
जीर्ण तारा बदलल्या जात नाहीत
प्रवाहित तार मंगळवारी दुपारी रस्त्यात लोंबकळत होती. आम्ही लगेच शाळेच्या बस दूरवर थांबवल्या. महावितरणला फोन करून तार जोडण्यास भाग पाडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, तार जोडणीसाठी वायर ही त्यांच्याकडे नव्हती, अशी वाईट परिस्थिती आहे.
- राहुल शिरसाट, जागरूक नागरिक
कायमस्वरूपी अधिकारी नाही
सहायक अभियंता निलंबित होऊन महिना उलटला. त्यांच्या जागी कायमस्वरूपी अधिकारी आलेला नाही. महावितरणने याकडे लक्ष द्यावे अन्यथा सातारा परिसरातील नागरिकांकडून आंदोलन छेडले जाईल.
-असद पटेल, समाजसेवक,
धोकादायक डीपी हलवा
यशोधरा कॉलनीत रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक डीपी हलवावी, रहदारीसाठी स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे . तक्रारी करूनही अधिकारी लक्ष देत नसल्याचे महेंद्र साळवे यांनी सांगितले.
सुटीच्या दिवशीच झाड कापणी व दुरूस्ती
दुरुस्तीचा अधिकृत वार शुक्रवार असून एरव्ही वीज बंद केली तर अनेकांचे नुकसान होते, असे अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी यांनी सांगितले.