जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या याद्या अद्याप अप्राप्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:41 IST2017-09-12T00:41:01+5:302017-09-12T00:41:01+5:30
० ते ६ वयोगटातील बालकांची एकात्मिक बाल विकास सेवा योजना व आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने प्रत्येक बालकाची तपासणी करून सॅम-मॅम यादी आठ दिवसांत कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी ४ आॅगस्ट रोजी दिल्या होत्या. मात्र अद्यापही सदर याद्या अपूर्णच आहेत.

जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या याद्या अद्याप अप्राप्तच
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : ० ते ६ वयोगटातील बालकांची एकात्मिक बाल विकास सेवा योजना व आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने प्रत्येक बालकाची तपासणी करून सॅम-मॅम यादी आठ दिवसांत कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी ४ आॅगस्ट रोजी दिल्या होत्या. मात्र अद्यापही सदर याद्या अपूर्णच आहेत.
जिल्ह्यातील कुपोषणाचा टक्का कमी करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतल्या जात आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असून मोहीम यशस्वीतेसाठी प्रशासन यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. कुपोषणमुक्त जिल्हा करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असले तरी, जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या संख्येचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात मासिक बैठक घेऊन कुपोषण निमूलनासंदर्भात सूचनाही देण्यात आल्या. ग्रामीण भागात कुपोषित १६४ तसेच मध्यम कुपोषित बालकांची ४४१ संख्या आहे. शहरी व ग्रामीण भागातील ०६ महिने ते ०६ वर्षे वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करून निकषाप्रमाणे कुपोषित बालकांना बालविकास केंद्रांमध्ये दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु याबाबत ठोस पाऊले उचलताना मात्र कुठे दिसून आले नाही.
शिवाय शासनाकडूनही याबाबत आवश्यक सूचना नसल्याचे विभागकडून सांगितले जात आहे. परिणामी, आॅगस्ट महिन्यातील मासिक बैठकीनंतर कुपोषित व तीव्र कुपोषित बालकांची संख्या व बालकांवरील उपचार याबाबतची माहितीही जि. प. बालकल्याण कार्यालयाकडे उपलब्ध नाही. जिल्ह्यातील १०८९ अंगणवाडी केंद्र कार्यरत असून बालकांना सकस आहार पुरविण्याची जबाबदारी यंत्रणेवर आहे. मात्र ११ सप्टेंबरपासून अंगणवाडी सेविका व मदतनिस अघोषित संपावर गेल्या आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामे ठप्प आहेत. शिवाय १ लाख बालकांच्या आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.