रात्री उशिरापर्यंत दारूची दुकाने, पेट्रोलपंप, हॉटेल्स सुरूच; राज्य उत्पादन शुल्क, एफडीए, डीएसओ यांना बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 19:09 IST2021-03-24T19:08:58+5:302021-03-24T19:09:27+5:30

२० ते २२ मार्चदरम्यान औरंगाबाद शहर व ग्रामीण हद्दीमध्ये संयुक्त पाहणीअंती, जालना रोडवरील हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे ग्राहकांना जेवण पुरविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.

Liquor stores, petrol pumps, hotels continue open till late at night; Notice issued to State Excise, FDA, DSO | रात्री उशिरापर्यंत दारूची दुकाने, पेट्रोलपंप, हॉटेल्स सुरूच; राज्य उत्पादन शुल्क, एफडीए, डीएसओ यांना बजावली नोटीस

रात्री उशिरापर्यंत दारूची दुकाने, पेट्रोलपंप, हॉटेल्स सुरूच; राज्य उत्पादन शुल्क, एफडीए, डीएसओ यांना बजावली नोटीस

ठळक मुद्देवेळप्रसंगी गुन्हे दाखल करणार

औरंगाबाद : जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन सुरू आहे. रात्री ८ पासून संचारबंदी आहे. तरीही शहरात रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन फूड सेवा देणारी हॉटेल्स, दारूची दुकाने, पेट्रोलपंप उघडी राहत असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क आणि एफडीए काहीही दक्षता घेत नसल्याचे निदर्शनास आल्याने त्या विभागप्रमुखांना मंगळवारी नोटीस बजावण्यात आली. यामध्ये एफडीएचे सहायक आयुक्त मिलिंद शहा, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सुधाकर कदम यांचा समावेश आहे.

२० ते २२ मार्चदरम्यान औरंगाबाद शहर व ग्रामीण हद्दीमध्ये संयुक्त पाहणीअंती, जालना रोडवरील हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे ग्राहकांना जेवण पुरविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. तसेच खासगी दुकाने, आस्थापना, देशी- विदेशी दारूची दुकाने, परमीट रूम, डायनिंग हॉल, हॉटेल्स, ढाबे हे संपूर्णत: बंद ठेवणे आवश्यक असतानाही वाळूज भागामध्ये काही अनधिकृत ठिकाणी बेकायदेशीरपणे देशी दारू विक्री सुरू असल्याचे समोर आले.

प्रोझोन मॉलमध्ये रात्री १० वाजता मॉलच्या पहिल्या मजल्यावर विविध हॉटेल्स, खासगी आस्थापना, डायनिंग हॉल व इतर उपाहारगृह व रेस्टॉरंटमध्ये डायनिंग हॉल, हॉटेल्स बेकायदेशीरपणे सुरू होती. हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद ठेवण्याच्या स्पष्ट सूचना असतानाही, त्या हॉटेल मालकाने मॉलच्या मागील दारामधून पार्सल सेवा पुरविली. संबंधित पार्सल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अनधिकृतपणे प्रवेश देऊन त्यांनी अंशत: लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन केले. महावीर चौकातील बाबा पेट्रोलपंप व गजानन महाराज मंदिरजवळील जागृती पेट्रोलपंप रात्री ८ नंतरही सुरू होते. या दोन्ही पेट्रोल पंपावर खासगी दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये, आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे उल्लंघन करून पेट्रोल व डिझेल भरून देण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

वेळप्रसंगी गुन्हे दाखल करणार
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, शहरात संचारबंदी सुरू आहे. आजवर एक्साईज, एफडीए आणि डीएसओेंनी काहीही कारवाई केली नाही. या विभागांनी काही कारवाई केली नाही, तर गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. नेमून दिलेले काम अधिकारी करीत नसतील तर हे दुर्दैवी आहे. आम्ही रात्री उशिरापर्यंत लॉकडाऊनची पाहणी करीत असताना इतर अधिकाऱ्यांनी का करू नये, असा प्रश्न आहे. पेट्रोलपंप, मॉलमधील फूडकोर्ट बंद केले आहेत.

Web Title: Liquor stores, petrol pumps, hotels continue open till late at night; Notice issued to State Excise, FDA, DSO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.