आरक्षित तलावातून पाण्याचा उपसा
By Admin | Updated: July 18, 2014 01:45 IST2014-07-18T00:17:33+5:302014-07-18T01:45:33+5:30
मोहनदास साखरे , मांडवा परळी तालुक्यात कमी पाऊस झाला असल्याने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जवळपास सर्वच तलावातील पाणी आरक्षित केले आहे.

आरक्षित तलावातून पाण्याचा उपसा
मोहनदास साखरे , मांडवा
परळी तालुक्यात कमी पाऊस झाला असल्याने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जवळपास सर्वच तलावातील पाणी आरक्षित केले आहे. मात्र पाणी समस्या बिकट झाली असल्यामुळे शेतकरी नाईलाजाने तलावातील पाणी शेतीला देत असल्याचे समोर आले आहे.
परळी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला असल्यामुळे मांडवा परिसरात पाणी समस्या बिकट बनली आहे. तालुक्यातील मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे तर दोन लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तीन प्रकल्प मृतसाठ्यात तर उर्वरित साठवण तलावात निम्म्यापेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यापूर्वी १ ते २ मोठे पाऊस झाले असल्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा पावसाने दडी मारली असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती जगवणे कठीण बनले आहे. परळी तालुक्यात नागापूर, बोरणा व बोधेगाव येथे तीन मध्यम तर चांदापूर, कन्हेरवाडी, गुट्टेवाडी, खोडवा सावरगाव, कातकटवाडी, मोहा, मालेवाडी, गोवलपूर, केरवाडी व दैठणा याठिकाणी लघु प्रकल्प आहेत. वास्तविक पाहता या दहाही गावांतील लघु प्रकल्पाची दुरवस्था झाली आहे. यामुळे लाखामोलाचे पाणी दरदिवशी वाया जात आहे. दरम्यान, परळी तालुक्यात जुलै महिन्यापर्यंत पाच मंडळामध्ये सरासरी १२६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षापेक्षा यंदा कमी पाऊस झाला आहे. यामुळे तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. तीन प्रकल्पांनी तळ गाठला आहे तर काही तलावामध्ये अर्ध्यापेक्षा कमी पाणी उपलब्ध आहे.
परळी शहराची तहान भागविणाऱ्या नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परळी तालुक्यात पाणीसमस्या बिकट बनली असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्यामुळे ते प्रकल्पामधून पाणी काढून घेत आहेत. पावसाने पाठ फिरविल्यामुळे ही समस्या गंभीर झाली आहे.
आरक्षित पाण्याचा उपसा होत असल्यामुळे पुढील काळात आणखी संकट बिकट होणार काय अशी चर्चा परिसरातील ग्रामस्थांत होत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास या पाण्याचे व्यवसायीकरण होण्याचे नाकारता येत नाही. या संदर्भात एका शेतकऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मांडवा परिसरात केवळ २ मोठे पाऊस झाले आहेत. त्यावरच पेरण्या करण्यात आलेल्या आहेत.
पेरणीसाठी जवळपास ३० हजार रुपये खर्च आलेला आहे. आता पावसाने पाठ फिरविली असल्याने पाणी उपसा केल्याशिवाय पर्याय नाही.