छत्रपती संभाजीनगर : कर्नाटक येथील शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाला सिद्धार्थ उद्यानातील पांढरा वाघ विक्रम, पिवळ्या वाघिणी रोहिणी आणि श्रावणी एक्सचेंज प्रक्रियेत देण्यात येणार आहे. शिवमोग्गा येथील दोन अधिकाऱ्यांच्या पथकाने सोमवारी वाघांची पाहणी केली. पुढील आठवड्यात महापालिकेतील अधिकाऱ्यांचे एक पथक शिवमोग्गा येथे सिंह, अस्वल, कोल्हे पाहण्यासाठी जाणार आहे.
महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात पिवळ्या वाघांची संख्या जास्त आहे. वाघांना ठेवण्यासाठी पिंजरे नाहीत. शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाने वाघांची मागणी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे केली होती. मागील महिन्यात प्राधिकरणाने वाघ देण्यास मंजुरी दिली. या मोबदल्यात छत्रपती संभाजीनगर महापालिकेला २ सिंह, २ अस्वल व २ कोल्हे देण्यात येतील. शिवमोग्गा येथील अधिकाऱ्यांचे पथक इंदौर प्राणिसंग्रहालयातून काही प्राणी घेणार आहे. तेथील प्राण्यांची पाहणी करून पथक सोमवारी शहरात दाखल झाले. त्यांनी ‘सिद्धार्थ’मधील वाघांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. सर्व प्राण्यांची योग्य काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाचे कार्यकारी संचालक व्ही. एम. अमराकशर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुरली मनोहर यांच्यासह मनपाच्या उपायुक्त अपर्णा थेटे, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शेख शाहेद, संजय नंदन, डॉ. नीती सिंग यांची उपस्थिती होती.
शिवमोग्गा येथील प्राणिसंग्रहालय तब्बल ६०० एकर परिसरात आहे. त्यात स्वतंत्र सफारी पार्कही आहे; पण प्राणी खूप असून, अनेकांना तर ठेवण्यासाठी जागा नाही. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी न घेता जे प्राणी नेता येतील, ते नेण्याची ‘ऑफर’ही मनपा अधिकाऱ्यांना दिली. १८ किंवा १९ ऑगस्ट रोजी मनपाचे पथक शिवमोग्गा येथे जाईल.