भायडी येथे विजेचा लपंडाव
By Admin | Updated: August 1, 2014 00:29 IST2014-08-01T00:16:54+5:302014-08-01T00:29:27+5:30
भायडी : भोकरदन तालुक्यातील भायडी येथे गेल्या अनेक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरु असून ग्रामस्थ अक्षरश: वैतागले आहेत
भायडी येथे विजेचा लपंडाव
भायडी : भोकरदन तालुक्यातील भायडी येथे गेल्या अनेक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरु असून ग्रामस्थ अक्षरश: वैतागले आहेत.
दोन महिन्यापासून पावसाने दमदार हजेरी लावलेली नसल्याने ठिबकवर लागवड केलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी विजेची २४ तास गरज आहे. परंतु भायडी परिसरात विजेचा सारखा लपंडाव सुरु आहे. परिणामत: शेतकरी मेटाकुटीस
आले असून पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपून जाण्याची वेळ आली आहे. शिवाय विजेचे कधीही अप-डाऊन होत असल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कृषीपंप निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. महावितरण कंपनीच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहेच. शिवाय होणाऱ्या उत्पादनावर पाणी सोडावे लागत आहे. विजेच्या लपंडावासंदर्भात संबंधितांना वेळोवेळी सांगूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी, ग्रामस्थांमधून तीव्र रोष व्यक्त होत आहे.
शालेय विद्यार्थ्यांचेही विजेअभावी मोठे हाल होत आहेत. गृहिणी असो की व्यावसायिक असो या सर्वांना विजेच्या लपंडावाचा फटका बसत आहे. एकीकडे वीज चोरीचे प्रमाण वाढलेले असताना त्यावर पायबंद करण्याऐवजी सर्वसामान्य जनतेला त्यासोबत भरडावे लागत असून वरिष्ठांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व पिकांच्या पाणीपाळीसाठी तरी चोवीस तास सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
दमदार पाऊस नसला तरी अधून मधून येणाऱ्या हलक्या सरींमुळे गावात पाण्याचे डबके साचलेले असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव वाढला आहे. वीज गुल होत असल्याने लहान मुले असो की प्रौढ असो या सर्वांना डासांच्या उपद्रवमूल्याला सामोरे जावे लागत आहे. डासांचे प्रमाण असेच वाढत गेले तर गावात साथीचे आजार फैलावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
महावितरणचे दुर्लक्ष
भायडी येथील विजेच्या लपंडावासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या; परंतु त्यांचेकडून दखल घेतली जात नाही. ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त सुध्दा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आहे.