परभणीत हलका पाऊस
By Admin | Updated: June 5, 2014 00:10 IST2014-06-04T23:49:49+5:302014-06-05T00:10:42+5:30
परभणी : मंगळवारी शहर व परिसरात हलकासा पाऊस झाला. या पावसामुळे शेतकर्यांबरोबरच नागरिकांना आता मान्सूनच्या पावसाचे वेध लागले आहेत.

परभणीत हलका पाऊस
परभणी : मंगळवारी शहर व परिसरात हलकासा पाऊस झाला. या पावसामुळे शेतकर्यांबरोबरच नागरिकांना आता मान्सूनच्या पावसाचे वेध लागले आहेत. बुधवारी शहरामध्ये सकाळपासूनच कडक ऊन पडले होते. दुपारनंतर वातावरणात बदल झाला. अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. सोसाट्याचे वारे वाहू लागले. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शहरात हलकासा पाऊसही झाला. मान्सूनपूर्व हा पाऊस होता. ७ जून रोजी मृग नक्षत्र असल्याने शेतकर्यांना आता खरीप पेरण्यांची ओढ लागली आहे. पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला असून सध्या शेतांमध्ये मशागतींची कामे सुरु आहेत. तसेच पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे, खते खरेदीसाठीदेखील शेतकरी पैशांची जुळवाजुळव करीत आहे. यावर्षी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. रबी हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे पिके हातची गेली. हा आर्थिक फटका खरीप हंगामातून भरुन काढण्यासाठी शेतकरी नगदी पीक घेण्यावर भर देत आहे. गतवर्षी सोयाबीनला चांगला उतारा आणि भाव आल्यामुळे यावर्षी सोयाबीनकडे शेतकर्यांचा कल आहे. परंतु, बाजारपेठेत सोयाबीनचे बियाणेच उपलब्ध नाही. त्यामुळे हे बियाणे मिळविण्यासाठी शेतकर्यांना धावपळ करावी लागत आहे.