‘शेततळ्या’वर उड्या
By Admin | Updated: April 15, 2016 01:49 IST2016-04-15T01:26:52+5:302016-04-15T01:49:04+5:30
औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेततळ्याचा मोठा आधार वाटू लागला आहे. म्हणूनच ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत मराठवाड्यातील

‘शेततळ्या’वर उड्या
औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेततळ्याचा मोठा आधार वाटू लागला आहे. म्हणूनच ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत मराठवाड्यातील तब्बल ४३ हजार शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली; पण अंतिम मुदतीपर्यंत त्यातील ३३ हजार जणांनीच अर्ज आणि शुल्काचा भरणा केला आहे. ही संख्यादेखील उद्दिष्टाच्या दुप्पट आहे. त्यामुळे विभागातील या ३३ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ १६ हजार २०० शेतकऱ्यांनाच शेततळ्यांचे अनुदान मिळू शकणार आहे.
मराठवाड्यात काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यंदाही पाण्याअभावी खरीप आणि रबीची पिके गमवावी लागली. या पार्श्वभूमीवर दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांतर्गत राज्य सरकारने ‘मागेल त्याला शेततळे’ योजना आणली आहे. त्या अंतर्गत कालपर्यंत आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. त्याला मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेंतर्गत शासनाने शेततळे खोदण्यासाठी जास्तीत जास्त ५० हजार रुपये अनुदान देऊ केले आहे. प्रत्यक्षात शेततळे खोदण्यासाठी लाख, दीड लाखांचा खर्च लागतो, याची कल्पना असूनदेखील उर्वरित रक्कम स्वत: खर्च करण्याची तयारी दाखवून असंख्य शेतकऱ्यांनी त्यांची नावनोंदणी केली आहे. मराठवाड्यात या योजनेंतर्गत एकूण ४३ हजार ७५६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परंतु नोंदणीनंतर अर्ज आणि त्याचे शुल्क भरणेही आवश्यक आहे. ती प्रक्रिया ३३ हजार २३४ शेतकऱ्यांनीच पूर्ण केली आहे. आता विविध निकषांच्या आधारे त्यातून उद्दिष्टाप्रमाणे शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी एकूण १६ हजार २०० इतके उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे. त्यामुळे एवढ्याच शेतकऱ्यांना शेततळ्यांच्या अनुदानाचा लाभ मिळू शकणार आहे. मराठवाड्यात सर्वाधिक नोंदणी ही औरंगाबाद जिल्ह्यात झाली आहे. याठिकाणी तब्बल ११ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. तर सर्वात कमी नोंदणी ही हिंगोली जिल्ह्यात झाली आहे. जालना, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केले आहेत.