प्लंबर हत्या प्रकरणात बबलासह चौघांना जन्मठेप; दगडभरून मृतदेह टाकला होता विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 07:25 PM2020-02-15T19:25:30+5:302020-02-15T19:26:11+5:30

दोन फरार आरोपींना अटक करण्याचे आदेश

life imprisonment Four with babalya in plumber murder case; The body was buried in a well filled with stone | प्लंबर हत्या प्रकरणात बबलासह चौघांना जन्मठेप; दगडभरून मृतदेह टाकला होता विहिरीत

प्लंबर हत्या प्रकरणात बबलासह चौघांना जन्मठेप; दगडभरून मृतदेह टाकला होता विहिरीत

googlenewsNext
ठळक मुद्दे  तिघांची निर्दोष सुटका 

औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी शहरातील हिलालनगर येथील प्लंबरचा निर्घृण खून करून मृताचे अनेक अवयव काढून शरीरामध्ये दगड भरून मृतदेह विहिरीत फेकल्याप्रकरणी  कुख्यात आरोपी बबला उर्फ शेख वाजेद  शेख असद याच्यासह अन्य तीन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. भोसले यांनी ठोठावली आहे. 

प्लंबर शेख जब्बार शेख गफ्फार यांच्या निर्घृण खुनामुळे संपूर्ण औरंगाबाद शहर हादरले होते. याप्रकरणी बुधवार (१२ फेब्रुवारी) रोजी न्यायालयाने चार जणांना दोषी ठरविले होते. आज न्यायालयाने या दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यात कुख्यात आरोपी बबला, त्याचा भाऊ शेख अमजद शेख असद ऊर्फ मोहसीन, तसेच सय्यद शहाबुद्दीन ऊर्फ शहाब सय्यद राशेद, या आरोपींना भारतीय दंड संहितेच्या ३०२, ३६४, ३६५, २०१ सह ३४ कलमान्वये दोषी ठरविले. प्रत्येकाला ३०२ कलमाखाली सश्रम जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी २० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने सक्तमजुरी सुनाविण्यात आली.

तसेच २०१ कलमाखाली प्रत्येकाला ३ वर्षांची सक्तमजुरी, प्रत्येकी ५ हजार रुपये दंड व तो दंड भरला नाही, तर १ महिन्याच्या सक्तमजुरी कारावासाची शिक्षा, याशिवाय ३६४ कलमाखाली प्रत्येकाला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी १० हजार रुपये दंड व तो न भरल्यास ४ महिने सश्रम कारावास याशिवाय भा.दं.वि. कलम ३६५ खाली प्रत्येकी ५ वर्षे सश्रम कारवास, प्रत्येकी ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर बबल्याला ३६४ कलमाखाली १० वर्षांचा सक्षम कारवास, कलम ३०२ खाली जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर आणखी १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

आरोपी शेख कलीम ऊर्फ कल्लू शेख सलीम यास भा.दं.वि. ३०२, २०१ सह ३४ व कलम ३६४, ३६५ सह ११४ प्रमाणे दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली. न्यायालयाने पुराव्याअभावी मोहम्मद अलिमोद्दीन ऊर्फ अलीम अन्सारी मोहम्मद मिनाजोद्दीन, मोहम्मद रिहान मोहम्मद रिझवान व अम्मार रझा रियाझ मेहंदी जहेदी यांना निर्दोष सोडले. माफीचा साक्षीदार शेख इम्रान ऊर्फ बाबा लोली शेख करीम  यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली. यामुळे माफीच्या साक्षीदाराला न्यायालयाने सोडले, तर जन्मठेप झालेल्या आरोपींना हर्सूल कारागृहात नेण्यात आले. सरकारच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी काम पाहिले. 

टेन्शन नहीं लेने का... 
न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनविल्यानंतर दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास बबला व अन्य तीन आरोपींना पोलीस बंदोबस्तात बाहेर उभ्या असलेल्या वाहनातून नेण्यात आले. या वाहनामध्ये चढण्याआधी बबला पोलिसांना म्हणाला की, ‘पहले बिड़ी-काड़ी लाव फिर मैं उपर चढ़ता.’ त्याच्या या मागणीमुळे पोलीस चक्रावले. अखेरीस बबलाला भेटण्यासाठी आलेल्यांपैकी एकाने बिडी-काडीची व्यवस्था केली.४वाहनामध्ये बसल्यावर खाली उभे असलेले आरोपींचे नातेवाईक, मित्र रडत होते. त्या वेळेस आरोपीमधील एक जण म्हणाला, ‘टेन्शन नहीं लेने का, हमारी किस्मत में जो लिखा है वो हो गया’ असे म्हणत त्यांनीच इतरांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. न्यायालयाबाहेर ‘दंगा नियंत्रण पथक’चे वाहनही उभे होते.

दंडाची रक्कम मृताच्या वारसांना देण्याचा आदेश 
आरोपींकडून मिळणाऱ्या दंडाच्या रकमेपैकी १ लाख रुपये मृताच्या वारसांना नुकसानभरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
फरार आरोपींना पकडून आरोपपत्र दाखल करण्याचा आदेश या प्रकरणातील फरार आरोपी शेख सिकंदर शेख बशीर व शेख हारुण शेख राजू यांना पकडून त्यांच्या विरुद्ध स्वतंत्र आरोपपत्र दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला आहे.
 

Web Title: life imprisonment Four with babalya in plumber murder case; The body was buried in a well filled with stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.