शाळा खोल्यांवरील पत्रे उडाले
By Admin | Updated: June 30, 2014 00:35 IST2014-06-30T00:17:41+5:302014-06-30T00:35:57+5:30
घाटनांदूर : येथून जवळच असलेल्या मैंदवाडी जिल्हा परिषदशाळेची व अंगणवाडी इमारतीची दुरवस्था झाली आहे.

शाळा खोल्यांवरील पत्रे उडाले
घाटनांदूर : येथून जवळच असलेल्या मैंदवाडी जिल्हा परिषदशाळेची व अंगणवाडी इमारतीची दुरवस्था झाली आहे. येथील शाळा खोल्यांचे दरवाजे खिडक्या मोडल्या आहेत. अंगणवाडी इमारतीवरील पत्रे उडून गेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर बसावे लागत आहेत.
मैंदवाडी जिल्हा परिषदेची शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे. येथील एकाही शाळा खोलीला दरवाजा नाही, पट मोडलेले आहेत. खिडक्या तुटलेल्या असून खोल्यावरील पत्र्यांची खिळापट्टी निघून गेली आहे. तोच प्रकार अंगणवाडी इमारतीबाबत असून वादळी वाऱ्यात अंगणवाडीवरील पत्रे उडून गेले आहेत. शाळा भरण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर मोकाट कुत्रे, गुरांचे वास्तव्य पहावयास मिळते. घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर पसरले आहे.
विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घ्यावे लागत असून दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवूनही परळी पंचायत समिती व गटशिक्षणाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सरपंच अरुण होळंबे यांनी केला आहे.
चारही वर्गखोल्यांची दुरवस्था झाल्याची माहिती मुख्याध्यापक राठोड यांनी दिली. शाळा दुरुस्तीसाठी तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा सरपंच होळंबे यांच्यासह ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करायचे कसे ?
मागील अनेक दिवसांपासून मैंदवाडी जि. प. शाळेच्या व अंगणवाडीच्या इमारतीचे काम झालेले नाही. चिमुकल्या विद्यार्थ्यांना भंगार खोल्यांमध्येच ज्ञानार्जन करावे लागत आहे. या शाळेच्या खोल्यांना असणारे दरवाजे मोडून पडले आहेत. तसेच शाळा खोल्यांवरील पत्रे उडून गेले आहेत. अशा परिस्थितीत येथील विद्यार्थ्यांना ऊन पावसाचा सामना करत ज्ञानार्जन करावे लागत आहे.