पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मुदतवाढीसाठी विधानसभेच्या उपाध्यक्षांचे कुलसचिवांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:11 IST2025-08-07T12:02:02+5:302025-08-07T12:11:40+5:30
विद्यापीठाने पीएच.डी.चे शिक्षण घेत असलेल्या ३०० विद्यार्थ्यांना शोधप्रबंध सादर करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली होती.

पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मुदतवाढीसाठी विधानसभेच्या उपाध्यक्षांचे कुलसचिवांना पत्र
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी.चे शिक्षण घेत असलेल्या ३०० विद्यार्थ्यांना शोधप्रबंध सादर करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली होती. मात्र, संबंधित विद्यार्थ्यांना शोधप्रबंधासाठी लागणारी माहिती गोळा करण्यासाठी वेळ लागला आहे. त्यामुळे त्यांना शोधप्रबंध सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतचा वेळ देण्यात यावा, यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांना बुधवारी पत्र पाठविले आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले की, विद्यापीठात पीएच.डी.चे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शोधप्रबंध सादर करण्यासाठी दिलेल्या मुदतीत प्रबंध सादर करता आलेला नाही. या शोधप्रबंधासाठी लागणारा कालावधी व माहिती संकलनासाठी लागणारा वेळ, आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये लेख प्रकाशित करण्यासाठी लागणारा कालावधी आदी, बाबींचा विचार करता पीएच.डी.साठी लागणारा कालावधी वाढवून देण्याची विनंती अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीचा विचार करता त्यांना शोधप्रबंध सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, असे म्हटले आहे.