पन्नास टक्के उमेदवारांची पोलिस भरतीकडे पाठ

By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T00:09:05+5:302014-06-14T01:20:23+5:30

उस्मानाबाद : जिल्हा पोलिस दलातील १४० पोलिस शिपाई भरतीसाठी येथे झालेल्या भरती प्रक्रियेत एकूण ४ हजार ६८१ उमेदवारांनी अर्ज भरले होते.

Less than fifty percent of the candidates recruit in police recruitment | पन्नास टक्के उमेदवारांची पोलिस भरतीकडे पाठ

पन्नास टक्के उमेदवारांची पोलिस भरतीकडे पाठ

उस्मानाबाद : जिल्हा पोलिस दलातील १४० पोलिस शिपाई भरतीसाठी येथे झालेल्या भरती प्रक्रियेत एकूण ४ हजार ६८१ उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र, यातील जवळपास पन्नास टक्के उमेदवारांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. हजर असलेल्या २३२३ उमेदवारांची मैदानी चाचणी गेल्या सहा दिवसांत पार पडलीअसून, यातील पात्र ठरलेल्या १२४५ उमेदवारांची लेखी परीक्षा १८ जून रोजी घेण्यात येणार आहे.
६ जूनपासून येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर या पोलिस भरती प्रक्रियेस प्रारंभ झाला होता. यासाठी विविध ठिकाणच्या ४ हजार ६८१ उमेदवारांनी अर्ज भरले होते. पोलिस प्रशासनाकडून दररोज ७५० याप्रमाणे उमेदारांना भरती प्रक्रियेसाठी बोलाविण्यात आले होते. भरती प्रक्रियेत पहिल्याच दिवशी २७९ जणांनी प्रक्रियेकडेच पाठ फिरविल्याचे तर १६५ उमेदवार अपात्र ठरले़ दुसऱ्या दिवशीच्या प्रक्रियेत १६२, तिसऱ्या दिवशी १५५, चौथ्या दिवशी २१३,तर पाचव्या दिवशी २४५ उमेदवारांनी या भरतीकडे पाठ फिरविली. बुधवारी पार पडलेल्या महिला उमेदवारांच्या भरती प्रक्रियेतही केवळ ३१९ महिलांनी उपस्थिती लावली होती. यातून १८६ महिला पात्र ठरल्या आहेत.
या उमेदवारांची दररोज लांब उडी, उंच उडी, धावणे, पुलअप्स आदी शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. यात ज्या उमेदवारांना पन्नास पेक्षा अधिक गुण मिळाले, त्यातून शासकीय प्रचलित नियमानुसार १:१५ या प्रमाणात एकूण १ हजार २४५ पुरूष व महिला उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यांनी १८ रोजी सकाळी सात वाजता पोलिस मुख्यालयात ओळखपत्रासह हजर रहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
मुख्यालयाच्या मैदानावर परीक्षा
विविध शारीरिक चाचण्यांमधून पात्र ठरलेल्या १२४५ उमेदवारांची लेखी परीक्षा बुधवारी सकाळी ७ वाजता पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना बँक कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवरून ज्या ठिकाणी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली होती, त्या मैदानातून प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच लेखी परीक्षेसंदर्भातील बैठक व्यवस्थेच्या माहितीचा फलकही मुख्यालयाच्या दर्शनीय भागावर लावण्यात येणार आहे. उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी येताना सोबत केवळ परीक्षा पॅड आणावे. याशिवाय ज्या उमेदवारांकडे कॅलक्युलेटर, मोबाईल, पुस्तक, चिठ्ठी आदी साहित्य आढळून आल्यास त्यांना परीक्षेतून अपात्र ठरविण्यात येणार असल्याचेही पोलिस अधीक्षक पाटील यांनी कळविले आहे.
चेस्ट क्रमांक नोटीस बोर्डावर
या लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा चेस्ट क्रमांक व प्रवर्गनिहाय निकाल पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर नोटीस बोर्डावर लावण्यात आला असून, याशिवाय पोलिस वेबसाईटवरही प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या नमुन्याचा व सूचनांचा फलक उमेदवारांच्या माहितीसाठी पोलिस मुख्यालयाच्या दर्शनी भागावर लावून वेबसाईटवरही उपलब्ध केला जाणार आहे.

Web Title: Less than fifty percent of the candidates recruit in police recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.