सोशल मीडियावरही विधानसभा प्रचाराची राळ
By Admin | Updated: October 8, 2014 00:51 IST2014-10-08T00:33:01+5:302014-10-08T00:51:01+5:30
उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही सोशल मिडीयाचे कट्टे राजकारणाच्या वाद-प्रतिवादाने गजबजून गेले आहेत.

सोशल मीडियावरही विधानसभा प्रचाराची राळ
उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही सोशल मिडीयाचे कट्टे राजकारणाच्या वाद-प्रतिवादाने गजबजून गेले आहेत. जवळपास सर्वच प्रमुख उमेदवारांनी सोशल मिडीयावरील प्रचारासाठी स्वतंत्र टीम नियुक्त केल्याने सध्या या आॅनलाईन माध्यमावर प्रचाराची धामधूम सुरु आहे.
स्मार्ट फोनच्या वाढत्या संख्येबरोबर सोशल मिडीयावरील माध्यमांची संख्याही वाढली आहे. पूर्वी केवळ फेसबुकवर सर्वांची मदार होती. आता फेसबुकबरोबरच व्हॉट्सअॅप तसेच हाईक आणि इतर व्यासपीठेही तरुणाईसाठी उपलब्ध झाली आहेत. त्यामुळेच रस्त्यावरील प्रचाराऐवजी या आॅनलाईन प्रचारावर बहुतांश उमेदवारांनी भर दिल्याचे चित्र आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने सोशल मिडीयाचा अत्यंत खुबीने वापर केला होता. त्यामुळे इतर पक्षही सजग झाले. मागील काही महिन्यापासूनच बहुतांश उमेदवारांनी सोशल मिडीयाच्या प्रचाराची मोर्चेबांधणी केली होती. या अनुषंगाने प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी थेट वॉररुमही उभारल्या आहेत. तेथे संगणकात प्रशिक्षीत असलेल्या तरुणांच्या माध्यमातून आपल्या उमेदवाराची प्रतिमा उजळ करणाऱ्या पोस्ट टाकल्या जात आहेत. याबरोबरच विरोधकांच्या टिका टिप्पणीला सडेतोड उत्तरेही दिली जात आहेत. त्यामुळेच तरुणांचे फोन सध्या मेसेजच्या रिंगटोनने खणखणत आहेत. विशेष म्हणजे राज्य स्तरावरील अनेक महत्वाच्या मुद्यावर व्हॉट्सअॅप तसेच फेसबुक ग्रुपवर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहे.
टी.व्ही.वरील जाहिरातींचा समाचार
सोशल मिडीयाप्रमाणेच टी.व्ही.वरील विविध वाहिन्यांवर सध्या सर्वच प्रमुख पक्षात जाहिरात युद्ध सुरु आहे. कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र याबरोबरच माझे नाव शिवसेना आणि काँग्रेसमुळेच महाराष्ट्र पहिला आदी जाहिरातींची यावेळी सर्वसामान्यातही चर्चा आहे. विशेष म्हणजे विविध खाजगी वाहिन्यांवरील या जाहिरातींची खिल्ली उडविण्याबरोबरच विरोधी उमेदवारांच्या जाहिराती कशा चुकीच्या आहेत हे सोशल मिडीयावरुन दाखवून दिले जात आहे. जाहिरातींना प्रतिउत्तर देत विरोधकांच्या जाहिरातींची हवा काढून घेण्याचा प्रयत्नही सोशल मिडीयाच्या माध्यमातून जोरात सुरु आहे. (प्रतिनिधी)