छत्रपती संभाजीनगर : तलाठीच्या परीक्षेत पेपर नाही लिहिला तरी चालेल, आम्ही नंतर गुण वाढवून घेऊ, असे आमिष दाखवून मंगलमूर्ती नागरी सहकारी पतसंस्थेच्या विशाल रामसिंग परदेशी (रा. एन-९) आणि रत्नाकर सुधाकर जोशी (रा. सुदर्शन नगर, एन-११) यांनी तिघांची ६५ लाख रुपयांची फसवणूक केली. आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीनंतर सिडको पोलिस ठाण्यात त्यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला.
शंकर पंडित दुसाने (६०, रा. आनंद पार्क, सिल्लोड) हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहे. ऑगस्ट-२०२३ मध्ये त्यांची त्यांचे जावई भूषण विसपुते यांच्या माध्यमातून आरोपी जोशी व परदेशीसोबत ओळख झाली होती. तेव्हा दोघांनी त्यांच्या अनेक मोठ्या सरकारी अधिकाऱ्यांसोबत ओळख असल्याचे सांगून त्यांच्या दोन्ही मुलांना तलाठी करण्याचे स्वप्न दाखवले. त्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली. मात्र, सदर ५० लाख जोशीच्या पतसंस्थेत संयुक्त नावे मुदत ठेव म्हणून ठेवण्यास सांगितले. नोकरीचे काम झाल्यावर मुदत ठेव थांबवून पैसे त्यांना देण्याचे ठरले. दुसाने यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत दोघांच्या नावे ५० लाखांची एफडी केली. नोकरीचे काम झाल्याशिवाय एफडी मोडणार नाही, असेही आरोपींनी आश्वासन दिले. जानेवारी-२०२४ मध्ये तलाठी परीक्षेचा निकाल लागला. मात्र पहिल्या दोन्ही यादीत दुसाने यांच्या मुलाचे नाव नव्हते.
नंतर गुण वाढवून घेऊजोशी व परदेशी दोघांनी दुसाने यांच्या मुलांना तलाठ्याच्या परीक्षेत उत्तर येत असलेले प्रश्न लिहा, बाकी आम्ही अधिकाऱ्यांकडून वाढवून घेऊ, असेही सांगितले. शिवाय तुमच्यासारख्याच आणखी २२ मुलांना आम्ही तलाठी करणार असल्याचे सांगितले. मात्र निकालानंतर दोन्ही मुलांचा निकाल अनुत्तीर्ण लागला. दुसाने यांनी त्यांना याबाबत विचारणा केल्यावर आरोपींनी मुंबईतील अधिकाऱ्यांना पैसे दिले आहे, ते परत घेऊन देतो, असे आश्वासन दिले. मात्र शेवटपर्यंत पैसे दिलेच नाही.
आरोपींनी एफडी परस्पर मोडून पैसे घेतलेदुसाने यांना संशय आल्याने त्यांनी पतसंस्थेत जाऊन चौकशी केली. त्यात आरोपींनी त्यांची ५० लाखांची एफडी परस्पर मोडून पैसे काढून घेतल्याचे समजले. त्यांच्याप्रमाणेच श्रीकांत पाखरे यांच्या मुलाला तलाठी बनवण्याचे आमिष दाखवून त्यांनी १५ लाख उकळले. सिडको पोलिसांना दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी सांगितले.