छत्रपती संभाजीनगर : "आज कोणालाच जिवंत सोडायचे नाही" अशा आरोळ्या देत राजकीय पाठबळावर गुंडगिरी करणाऱ्या निमोने कुटुंबाने पाडसवान कुटुंबावर घरासमोरच राक्षसी हल्ला केला. या रक्तरंजित हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून त्यातून हल्ल्याची तीव्रता, गुंडगिरी आणि निर्दयपणा स्पष्ट दिसतो.
शुक्रवारी दुपारी १ वाजता एन-६ संभाजी कॉलनीत ही घटना घडली. किराणा व्यापारी प्रमोद रमेश पाडसवान (३८) यांचा रस्त्यातच मृत्यू झाला, तर वडील रमेश पाडसवान (६०) आणि मुलगा रुद्राक्ष (१७) गंभीर जखमी झाले.
जमीन वादातून राक्षसी हल्लापाडसवान कुटुंबाने दोन वर्षांपूर्वी सिडकोची अतिरिक्त (ऑडशेप) जमीन रीतसर विकत घेतली होती. मात्र, या जमिनीवरून गेल्या दोन वर्षांपासून निमोने कुटुंबाशी वाद सुरू होता. गणेशोत्सवाच्या तयारीदरम्यान वाद पुन्हा पेटला. पाडसवान यांनी अर्धा प्लॉट देण्याची तयारी दाखवली तरी निमोने कुटुंब संपूर्ण प्लॉट रिकामा करण्याच्या हट्टावर ठाम राहिले.
"आज कुणालाच सोडायचं नाही"हल्ल्यादरम्यान सौरभ, ज्ञानेश्वर, गौरव या तिघा भावांनी वडील काशीनाथ, आई शशिकला आणि जावई मनोज दानवे यांच्यासह थेट घरासमोरच प्राणघातक हल्ला केला. शशिकलाने हातात चाकू देत ‘सर्वांना डोळे, तोंड दाबून मारून टाका’ असे भडकावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजमध्येही स्पष्टपणे दोन्ही कुटुंबातील संघर्ष दिसून येतो. निमोने कुटुंबाने थेट चाकू आणि रॉडने हल्ला चढवत पाडसवान कुटुंबावर सपासप वार केले. यात प्रमोद रक्तबंबाळ अवस्थेत घरासमोर पडलेला दिसतो. तर त्याचा मुलगा आणि वडिलांना देखील बेदम मारहाण केल्याचे दिसून येते. प्रमोद पाडसवान यांच्या पाठीवर आणि पोटावर खोलवर वार झाले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या १७ वर्षांच्या मुलाने स्वतः गंभीर जखमी असतानाही वडील आणि आजोबांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. हल्ल्यात त्यांचेही हात आणि खांदे जखमी झाले आहेत.
प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संतापनिमोने कुटुंबाविरोधात गेल्या दोन वर्षांत सातपेक्षा अधिक तक्रारी असूनही पोलिस व सिडकोने कोणतीच ठोस कारवाई केली नाही. त्यामुळेच त्यांच्या गुंडगिरीला खतपाणी मिळाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील हल्ल्याचे थरारक दृश्य प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पर्दाफाश करतात.