घरात अर्भक टाकून महिला पसार
By Admin | Updated: July 20, 2015 00:52 IST2015-07-20T00:44:07+5:302015-07-20T00:52:31+5:30
लोहारा : दुसऱ्या घरात साडीत गुंडाळलेले अर्भक टाकून महिलेने पोबारा केल्याची घटना तालुक्यातील मार्डी येथे रविवारी सकाळी घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घरात अर्भक टाकून महिला पसार
लोहारा : दुसऱ्या घरात साडीत गुंडाळलेले अर्भक टाकून महिलेने पोबारा केल्याची घटना तालुक्यातील मार्डी येथे रविवारी सकाळी घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, तालुक्यातील मार्डी येथील मुक्ताबाई अच्युत मिसाळ या रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घराचे दार पुढे करून पाटोदा येथील बाजारासाठी गेल्या होत्या. घरात कोणीच नसल्याचे पाहून अज्ञात महिलेने दोन दिवसांपूर्वी जन्मलेले स्त्रीजातीचे अर्भक एका साडीत गुंडाळून ते मिसाळ यांच्या घरात ठेवून पोबारा केला. काही वेळानंतर हे बाळ रडण्याचा आवाज आजूबाजूच्या लोकांना आल्याने त्यांनी गावात चौकशी केली. परंतु, गावातील कोणत्याही महिलेचे हे अर्भक नसल्याचे दिसून आले. त्यामुळे याबाबत लोहारा पोलिसांना कळविण्यात आले. पोनि संतोष गायकवाड, पोकॉ के. ए. सांगवे, एन. बी. वाघमारे, शेवाळे, क्षीरसागर यांनी घटनास्थळी जावून या अर्भकास ताब्यात घेतले. यानंतर येथील ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. येथील डॉ. एम. डी. काळे यांनी सदरील बाळ दोन दिवसांपूर्वी जन्मले असल्याचे सांगितले.
दरम्यान, या बाळास पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी सकाळपासूनच एक महिला मिसाळ यांच्या घराच्या आजुबाजुला घुटमळत असताना पाहिल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. त्या दृष्टीने तपास सुरू केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.