प्रचाराला नेते आले नाहीत म्हणून झाली होती दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:13 IST2019-04-02T00:12:47+5:302019-04-02T00:13:14+5:30

अ‍ॅड. काशीनाथ नावंदर.... हैदराबाद मुक्तिसंग्रामामध्ये सहभाग घेतल्यानंतर मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न समाजवादी मंडळी प्रभावीपणे मांडत होती. त्यासाठी विविध मार्गांचा अवलंब ...

As the leaders did not come to campaign, the stone pelting was done | प्रचाराला नेते आले नाहीत म्हणून झाली होती दगडफेक

प्रचाराला नेते आले नाहीत म्हणून झाली होती दगडफेक



अ‍ॅड. काशीनाथ नावंदर....
हैदराबाद मुक्तिसंग्रामामध्ये सहभाग घेतल्यानंतर मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न समाजवादी मंडळी प्रभावीपणे मांडत होती. त्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात होता. हा लढा संपताच संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. यातही मराठवाडा संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने लढ्यात सहभागी झाला. मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षे हैदराबाद राज्यात समाविष्ट होता. तेव्हा विधानसभा हैदराबादेत होती. त्यावेळी प्रचारात गरिबी, शिक्षण, आरोग्य हेच जीवनावश्यक विषय होते.
लोकांमध्ये स्वाभिमानी हैदराबाद लढ्याचा उत्साह होता. यातून मराठी भाषिक राज्याच्या मागणीनुसार मराठवाडा महाराष्ट्रात विनाअट समाविष्ट झाला. तेव्हा समाजवादी पक्षाच्या उमेदवारांसाठी हिरीरीने प्रचारात सहभागी होत. जात-धर्म-पंथाचा लवलेशही प्रचारात नसे. आमचे उमेदवार नेहमीच विकासाची भाषा करायचे. विरोधी काँग्रेसही कधीच वैयक्तिक, जातीय प्रचार करीत नसे. पुढे देशात आणीबाणी लागू झाली. तेव्हा समाजवादी, जनता दल आदी पक्षांनी प्रखर विरोध केला. देशभर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात वादळ निर्माण केले. आणीबाणीनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. बापूसाहेब काळदाते यांना जनतेने निवडून दिले. देशात काँग्रेसविरोधी पक्षांची लाट होती. जनता दल पक्ष जोरात होता. १९७८ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता दलाचे औरंगाबाद (जालन्यासह) जिल्ह्यातून ७ आमदार निवडून आले होते. इंदिरा काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या दिग्गजांचा पराभव झाला. मात्र वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून शरद पवार मुख्यमंत्री बनले. ते सरकार इंदिरा गांधी यांनी १९८० साली पंतप्रधान होताच बरखास्त करून टाकले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आय काँग्रेसची लाट निर्माण झाली होती. औरंगाबादेत काझी सलीम हे खासदार बनले. त्याच वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आय काँग्रेस आणि जनता दल यांच्यात लढत झाली. जनता दलाकडून मला तिकीट मिळाले होते. माझ्याविरोधात आय काँग्रेसने अब्दुल अजीम यांना तिकीट दिले. या निवडणुकीत जनता दल आणि जनसंघातील युतीची बोलणी फिसकटली. या निवडणुकीत माझा पराभव झाला. अब्दुल अजीम हे आमदार बनले. तेव्हा माझ्या प्रचारासाठी भारताचे उपपंतप्रधान राहिलेले जगजीवन राम येणार होते. आमखास मैदानावर जाहीर सभा आयोजित केली होती. लोक दुपारी दोन वाजेपासूनच त्यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी जमले होते. चार वाजले तरी ते आले नाहीत. सहा वाजेपर्यंत लोक थांबले. शेवटी लोकांच्या सहनशीलतेचा अंत झाला. त्यांनी औरंगपुऱ्यातील माझ्या प्रचार कार्यालयावर चाल करून येऊन दगडफेक केली. ही एक वादग्रस्त घटना घडली होती. याच निवडणुकीत राज बब्बर, मृणालताई गोरे यांनी माझ्यासाठी प्रचार सभा घेऊन निवडणुकीत रंगत आणली. मात्र जनसंघाने मदत न केल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला.
निवडणुकीत हार-जीत होते. हे तेव्हा गृहीत धरलेले असायचे. पराभव झाला तरी फार काही परिणाम होत नसे. आमचे काम दुसऱ्या दिवसापासून सुरू होत असे. पुढे वकिलीतच अधिक लक्ष देऊन जम बसवला. बार असोसिएशनचा अध्यक्ष असताना औरंगाबादेत मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू व्हावे यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही भेट घेतली होती. वयाच्या ९२ व्या वर्षी त्या सगळ्या आठवणी जाग्या राहिल्या आहेत.
शब्दांकन : राम शिनगारे

Web Title: As the leaders did not come to campaign, the stone pelting was done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.