नेते, कार्यकर्ते ‘गॅस’वरच !
By Admin | Updated: September 23, 2014 23:42 IST2014-09-23T23:34:29+5:302014-09-23T23:42:26+5:30
संजय तिपाले, बीड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकणाऱ्या महायुतीत जागा वाटपावरुन झालेली खेचाखेची आता थांबली आहे.

नेते, कार्यकर्ते ‘गॅस’वरच !
संजय तिपाले, बीड
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकणाऱ्या महायुतीत जागा वाटपावरुन झालेली खेचाखेची आता थांबली आहे. युती तुटणार नाही, याचे संकेत श्रेष्ठींनी दिल्यामुळे जिल्ह्यातील युतीच्या कार्यकर्त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आता जिल्ह्यातील कोणती जागा कोणाला सुटणार? तसेच उमेदवार कोण? यावरुन आणखी संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे इच्छुकांसह त्यांचे चाहते ‘गॅस’वरच आहेत.
जिल्ह्यातील ६ मतदारसंघापैकी पाच मतदारसंघ भाजपाकडे तर एक मतदारसंघ सेनेकडे असे ठरलेले समीकरण आहे. मात्र साडेतीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीमध्ये रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी आघाडी, रासप, शिवसंग्राम हे घटक पक्ष सामील झाले. ही महायुती घडवून आणण्यात दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांचा मोठा पुढाकार राहिलेला आहे. याच घटक पक्षातील शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे हे बीडचेच आहेत. त्यामुळे महायुतीतील सध्याच्या राजकीय घडामोडीकडे जिल्ह्याचे अधिकच लक्ष वेधले होते. आ. मेटे हे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. त्यांनी बीडची जागा स्वत:साठी मागून सेनेची पुरती कोंडी केली आहे. क्षीरसागरांविरुद्ध शड्डू ठोकत त्यांनी ‘संग्रामा’ची तयारी दाखविली खरी परंतु त्यांना जागा सोडून घेण्यासाठीच झुंजावे लागत आहे.
महत्वाचे म्हणजे या दरम्यानच शिवसेना-भाजपात जागा वाटपावरुन प्रचंड ओढाताण झाली. दोन्ही पक्ष टोकाला गेल्यामुळे घटक पक्ष म्हणून ज्यांना महायुतीमध्ये घेतले होते, त्यांची डाळ शिजणे मुश्कील झाले होते. मात्र मंगळवारी युतीमध्ये जागा वाटपावरुन तोडगा निघाल्याचे संकेत आहेत. आता राहिला प्रश्न महायुतीतील घटक पक्षांच्या जागा वाटपाचा. या जागा वाटपाकडेच आता संपूर्ण जिल्हा वासियांच्या नजरा वेधल्या आहेत. शिवसंग्रामने केज, गेवराई या जागांवरही दावा सांगितलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीतील जागा वाटपात कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येतो? हे सांगणे कठीण बनत आहे. बीडमध्ये क्षीरसागरांविरुद्ध मेटे की शिवसेनेचे अनिल जगताप हा तिढा कायम आहे. त्यामुळे महायुती कोणाला आखाड्यात उतरविते? हे पाहणे रोमांचक ठरत आहे.
याशिवाय जिल्ह्यातील केज, माजलगाव व आष्टी या मतदारसंघामध्ये युतीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेले आहे. मंगळवारपर्यंत युती टिकणार की नाही? याचे चित्र स्पष्ट होत नव्हते. मागील चार दिवसांत एक-दुसऱ्यावरील आरोप-प्रत्यारोपही थंडावले होते. मात्र मंगळवारी दुपारनंतर युती टिकणार असल्याचे संकेत दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघामध्ये युतीचे उमेदवार कोण? या चर्चेला उधाण आले आहे. आघाडीने मात्र प्रचाराचा धुराळा उडविला आहे.