असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 20:18 IST2025-07-20T20:18:38+5:302025-07-20T20:18:53+5:30
अशा मंत्र्याचा राजीनामा घेऊन त्यांना रमी खेळण्यासाठी कायमस्वरुपी घरी बसवा, अशी आपली मुख्यमंत्र्याकडे मागणी असल्याचे आ.दानवे म्हणाले.

असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
बापू सोळुंके/ छत्रपती संभाजीनगर: पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे, शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मात्र विधीमंडळात रमी खेळत असल्याचे दिसले. अशा असवंदेनशील कृषीमंत्र्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा घ्यावा,आणि त्यांना रमी खेळण्यासाठी घरी बसवा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
आ. दानवे म्हणाले की, पावसाअभावी राज्यातील शेतकऱ्यांवर दुबारपेरणी करावी लागत आहे, दुसरीकडे त्यांना बोगस बियाणे मिळाल्याच्या तक्रारीही आहेत, असे असताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात रमी खेळत असल्याची व्हिडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली. किती ही असंवेदनशिलता आहे हे यानिमित्ताने दिसून येते. असले लोक मंत्रीमंडळात आहे हे राज्याचे दुर्देवच म्हणावे लागेल. कोकाटे यांनी कृषीमंत्रीपद म्हणजे आधी ओसाड गावची पाटिलकी, असे विधान केले होते. तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ते कसले ढेकळाचे पंचनामे करायचे असे म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले होते. असा असंवेदनशिल मंत्री मंत्रीमंडळात आहे, याचा अर्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची काहीतरी मजबुरी असेल, असा टोला त्यांनी लगावला. अशा मंत्र्याचा राजीनामा घेऊन त्यांना रमी खेळण्यासाठी कायमस्वरुपी घरी बसवा, अशी आपली मुख्यमंत्र्याकडे मागणी असल्याचे आ.दानवे म्हणाले.
आमचे नेते उघडपणे भेटतात, बोलतात
आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते एका हॉटेलमध्ये भेटल्याने युतीचे संकेत आहे का,असे विचारले असता असता आ. दानवे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते त्या हॉटेलमध्ये गेले होते. तेथे मुख्यमंत्री त्यांच्या कामानिमित्त गेले. ठाकरे हे उघडपणे भेटणारे बोलणारे आहेत. ते दोघेही योगायोगाने एकाच हॉटेलमध्ये गेल्याचे सांगून दानवे यांनी या भेटीवर पडदा टाकला.