सामान्यांचा नेता हरपल्याची भावना
By Admin | Updated: June 4, 2014 00:46 IST2014-06-04T00:30:47+5:302014-06-04T00:46:05+5:30
हिंगोली : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
सामान्यांचा नेता हरपल्याची भावना
हिंगोली : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी वटवृक्ष असणार्या या नेत्याच्या अचानक जाण्याने मराठवाडा पोरका झाला तर महाराष्टÑासह देशाच्या राजकारणाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात आणून मोठे करणारे गोपीनाथ मुंडे यांचे व्यक्तिमत्व होते. ते तळागाळातील कार्यकर्त्यांचा आवाज होते. म्हणून कोणत्याही वेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या हाकेला त्यांनी साद दिली. या नेत्यामुळेच भारतीय जनता पक्षात सर्वसामान्यांचा समावेश झाला. देशाच्या राजकारणात मोठे पद असूनही त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले. अहंकाराचा वारा न लागू दिलेला हा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला. परिणामी राज्यावर शोककळा पसरली आहे. लोकनायक असलेल्या या नेत्याची भविष्यात कायम उणीव भासणार असून ही हानी कधीही न भरून निघणारी आहे, असेही सर्वपक्षीय मंडळींनी प्रतिक्रिया देताना सांगितले. मुंडे यांना वसमत येथे श्रद्धांजली केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त समजताच वसमत येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यास मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वसमत येथील सरस्वती मंदिरात झालेल्या या श्रद्धांजली सभेस भाजपाचे शिवदास बोड्डेवार, नगरसेवक नवीनकुमार चौकडा, माजी नगराध्यक्ष अ. हफीज अ. रहेमान, शहराध्यक्ष अजगर पटेल, प्रकाश भोसले, सभापती राजू पाटील नवघरे, अनिल कदम, सुभाष लालपोतू, मन्मथआप्पा बेले, लक्ष्मीकांत कोसलगे, सुनील कारले, वैजनाथ गुंडाळे, शिवाजी अलडींगे, डॉ. डी.बी. पार्डीकर, दीपक कुल्थे, रवी काशिनाथ भोसले, संजय भोसले, सत्यविजय अन्वेकर, भारत पवार, भगवान कुदाळे, भैय्या मोदी, माजी नगराध्यक्ष शशीकुमार कुल्थे, प्रल्हाद राखोंडे, अरुण दांडेगावकर, भास्कर गवळी, शमीम सिद्धीकी, प्रा. गणेश कमळु, राजेश पवार, तानाजी कदम, जगदीश मोरे, महेंद्र कापूसकरी यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुधवारी वसमत बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. कणखर नेता गमावला -जयप्रकाश मुंदडा गोपीनाथराव मुंडे हे एक महाराष्टÑाला लाभलेले वादळी व कणखर नेतृत्व होते. महाराष्टÑाच्या ग्रामीण भागाची ओळख व ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांची त्यांना जाण होती. तळागाळातील जनतेशी त्यांची नाळ जुळलेली होती. म्हणूनच त्यांचा राजकीय क्षेत्रात दरारा होता. युतीच्या काळात उपमुख्यमंत्री असलेले गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत मंत्रीमंडळात काम करण्याची संधी मला लाभली. त्यावेळी त्यांच्या कार्य करण्याची धमक व कणखर निर्णय घेण्याची क्षमता याचा जवळून अनुभव आला. त्यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध होते. पक्षाचे काम करताना इतर पक्षातील नेते व पदाधिकार्यांशी ते चांगले संबंध ठेवत असत हाही त्यांचा एक गुण होता. त्यांच्या अकाली जाण्याने एक कणखर नेतृत्व व मराठवाड्याच्या विकासाचे ध्येय असलेला नेता आपण गमावला. गोपीनाथरावांसारखा नेता आता मराठवाड्यात लाभणे अशक्यच. सर्वसमावेशक नेता-गणेशराव ढाले महाराष्ट्र तथा मराठवाड्याचे दिल्लीत नेतृत्व करणारे गोपीनाथ मुंडे हे भाजपचे लोकप्रिय नेते होते. नेहमी सर्वसामान्यांना सोबत घेवून चालत असल्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने मराठवाड्याची तसेच महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. कारण तीन दशकांचा राजकारणातील अनुभव असल्यामुळे विकासाची जाणीव होती. ग्रामविकासाच्या दृष्टीने प्रश्न सोडविण्यासाठी नुकत्याच झालेल्या बैैठकीत त्यांनी बांधणी केली होती. अकाली जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.