अॅट्रॉसिटीचा कायदा अजिबात रद्द होणार नाही
By Admin | Updated: October 15, 2016 01:19 IST2016-10-15T01:05:56+5:302016-10-15T01:19:02+5:30
औरंगाबाद : अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही, पण त्याचा गैरवापर होणार नाही. कुणाला आपण मुद्दामहून त्रास द्यायचा नाही. परंतु कुठे अत्याचार झाला

अॅट्रॉसिटीचा कायदा अजिबात रद्द होणार नाही
औरंगाबाद : अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही, पण त्याचा गैरवापर होणार नाही. कुणाला आपण मुद्दामहून त्रास द्यायचा नाही. परंतु कुठे अत्याचार झाला तर कायदा मागे लागल्याशिवाय राहणार नाही. कायद्यात बदल करण्याचे अधिकार संसदेला आहेत, असे स्पष्टीकरण देऊन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे सांगितले. धम्मयान एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल फॉर सोशल अँड कल्चरल रिलेशनशिप या कार्यक्रमात ते बोलत होते.
आठवले म्हणाले, मराठा क्रांती मोर्चे शांततेत निघाले. कोपर्डी घटनेनंतर मराठा समाज जागा झाला आहे. त्या समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. परंतु एस.सी., एस.टी., ओ.बी.सी. समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले पाहिजे. हे घटक सोडून उर्वरित ५० टक्क्यांतील २५ टक्के आरक्षण देण्याबाबत विचार व्हावा. ते आरक्षण देण्यासाठी संविधानात बदल करावा लागेल.
मराठा समाजानेच आजवर स्वत:च्या समाजावर सूड उगविण्यासाठी आमच्या माणसांना पुढे केल्याच्या अनेक घटना आहेत. ग्रामपंचायती निवडणुकांपासून तसे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मराठा समाजानेदेखील आत्मपरीक्षण केले पाहिजे. दलितांनी सवर्णांवर अत्याचार केले तर फाशी द्या. कोपर्डीतील घटनेतील आरोपी पकडून देण्यात आरपीआय कार्यकर्त्यांनी मदत केली.
आठवलेंच्या कवितांवर टाळ्या
केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी काही कविता सादर करून वातावरणात जाण आणली. ‘मैं अब किसी से नही डरूंगा’ एक दिन मैं भारत को बुद्धमय करूंगा’, जो काढील माझी लाल दिव्याची गाडी, त्याची जाळून टाकीन माडी, संविधानाला दिला कुणी धोका, त्याला देऊन टाकू ठोका, अशा कविता त्यांनी सादर करून हसविले.