लातूर तालुका टंचाईग्रस्तच !
By Admin | Updated: August 20, 2014 01:52 IST2014-08-20T01:10:14+5:302014-08-20T01:52:40+5:30
लातूर : लातूर तालुक्यात सरासरी ३२ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पण शासन दरबारी ७५ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

लातूर तालुका टंचाईग्रस्तच !
लातूर : लातूर तालुक्यात सरासरी ३२ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पण शासन दरबारी ७५ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त तालुक्यात लातूरची घोषणा होऊ शकली नाही. दरम्यान, जिल्हधिकाऱ्यांनी शासनाला पत्र पाठवून लातूर तालुक्यात केवळ ३२ टक्के पाऊस झाल्याचे कळविले आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत लातूर तालुक्याचा टंचाईगस्त म्हणून समावेश होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर वगळता चाकूर, शिरूर अनंतपाळ, जळकोट, निलंगा, उदगीर, औसा, रेणापूर, अहमदपूर, देवणी या नऊ तालुक्यांचा टंचाईत समावेश करण्यात आला आहे. सर्वच तालुक्यांत पावसाची सारखीच स्थिती आहे. पण नजरचुकीमुळे लातूर तालुक्यात ७५ टक्के पाऊस झाल्याची नोंद शासनाकडे झाली आहे. त्यामुळे लातूरला टंचाईतून वगळण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी लातूर तालुक्यात पडलेल्या पावसाची मंडळनिहाय माहिती शासनाला पत्र पाठवून तात्काळ कळविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या माहितीवरून बुधवारी होणाऱ्या मत्रिमंडळाच्या बैठकीत लातूर तालुक्याला टंचाईत समावेश केले जाईल, अशी महसूल प्रशासनाला अपेक्षा आहे. टंचाईग्रस्त तालुक्यांत महसूलचा पूर्ण शेतसारा माफ, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ तसेच काही प्रमाणात विजबीलात सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. टंचाईच्या उपाययोजनाही टंचाईग्रस्त तालुक्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे लातूरचा टंचाईत कधी समावेश होतो याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी) टंचाईत काय उपाययोजना आहेत. कोणत्या सवलती देण्यात येणार आहेत. याबाबत शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना प्रशासनाला मिळाल्या नाहीत. केवळ घोषणा झाली आहे. त्यामुळे टंचाईचा कोणताही कार्यक्रम जिल्ह्यात सुरू झाला नाही. शिवाय, पूर्वीच्या कृती आराखड्यानुसारच पाणीटंचाईच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. पाण्यासाठी अधिग्रहण करणे, नळयोजना करणे, पूरक नळयोजना हीच कामे सुरू आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त तालुक्यांत काय कामे होणार आहेत, याची उत्सुकता लागली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले अद्याप शासनाचा अद्यादेश आला नाही. आदेश आल्यानंतर जिल्ह्यात टंचाईच्या उपाययोजना सुरू करण्यात येतील. जिल्ह्यात जूनअखेर ५२.११, जुलैअखेर ११९.०२, आॅगस्टअखेर २६.४३ मि. मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत सरासरी १९७ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी आॅगस्टअखेर ५५३.९९ मि. मी. पाऊस झाला होता. यंदा मात्र गतवर्षीच्या तुलनेत निम्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे. लातूर तालुक्यात केवळ १९२.७२ मि.मी. पाऊस झाला आहे. तरीही शासनाकडे ७५ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. या चुकीमुळे सध्यातरी लातूर तालुका टंचाईपासून वंचित आहे.