नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून जायकवाडीसाठी पुन्हा मोठा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:04 IST2021-09-23T04:04:31+5:302021-09-23T04:04:31+5:30

पैठण : जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या धुवाधार पावसाने नाथसागरात १७,९३७ क्युसेकने आवक सुरू आहे. तोच बुधवारी ...

Large discharge for Jayakwadi from dam group in Nashik district | नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून जायकवाडीसाठी पुन्हा मोठा विसर्ग

नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून जायकवाडीसाठी पुन्हा मोठा विसर्ग

पैठण : जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या धुवाधार पावसाने नाथसागरात १७,९३७ क्युसेकने आवक सुरू आहे. तोच बुधवारी दुपारनंतर नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून गोदावरीत विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरणात येणारी आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. दरम्यान, बुधवारी रात्री धरणाचा जलसाठा ७५ टक्क्यांवर झाला होता. धरणात येणारी आवक लक्षात घेता धरण पूर्ण क्षमतेने भरेल असा अंदाज वर्तविला जात आहे.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा या तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू असल्याने मंगळवारी दुपारनंतर जायकवाडी धरणात येणारी आवक वाढत गेली. दरम्यान, बुधवारी सकाळी १७,९३७ क्युसेसने नाथसागरात पाणी दाखल होत होते.

-------

नाशिक जिल्ह्यातून पुन्हा मोठा विसर्ग

नाशिक जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. तेथील धरण समूहापैकी दारणा २,७०८ क्युसेस, गंगापूर ८,१२९ क्युसेस, गौतमी ७५० क्युसेस व कडवा धरणातून ४२४ क्युसेस असा विसर्ग बुधवारी दुपारी करण्यात आला. सायंकाळी पाच वाजता नांदूर मधमेश्वर धरणातून मात्र ३२,६९४ क्युसेक असा मोठा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून बुधवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान १,०८५ क्युसेस विसर्ग करण्यात आला. हे पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असे नाशिक पाटबंधारे विभागाने कळविले आहे.

----

५७ टीएमसी उपयुक्त जलसाठा

१५२२ फूट क्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी बुधवारी १५१७ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा २३५७.४९४ दलघमी (८३ टीएमसी) तर उपयुक्त जलसाठा १६१९.४९४ दलघमी (५७ टीएमसी) एवढा झाला आहे. येणारी आवक लक्षात घेता धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असल्याने जलसाठ्यात वाढ होणार असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

Web Title: Large discharge for Jayakwadi from dam group in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.