बनावट कागदपत्राअधारे कोट्यवधींची जमीन हाडपली
By Admin | Updated: June 3, 2014 01:10 IST2014-06-03T01:05:52+5:302014-06-03T01:10:50+5:30
औरंगाबाद : बनावट कागदपत्रे तयार करून पैठण येथील जमीन हडप करणार्या पाच जणांविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्राअधारे कोट्यवधींची जमीन हाडपली
औरंगाबाद : बनावट कागदपत्रे तयार करून पैठण येथील जमीन हडप करणार्या सय्यद हबीब सय्यद इमाम, सय्यद बना सय्यद दगडू, सय्यद नसीर सय्यद इमाम (रा. चित्तेगाव, पैठण) व त्यांना साह्य करणारे तत्कालीन तहसीलदार राजीव शिंदे व तलाठी टी. व्ही. सानप या पाच जणांविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बन्सीलालनगरातील रहिवासी बाबा भांड, तसेच आशा भांड, साकेत भांड, किरण देशमुख, रामभाऊ जगताप व दत्तात्रय जगताप यांची चित्तेगाव शिवारातील गट नंबर ६१ मध्ये एकूण १९ एकर २७ गुंठे शेतजमीन आहे. १९९३ साली त्यांनी ही जमीन चंद्रकांत तांदळे यांच्याकडून खरेदी केली आहे. ही जमीन सध्या भांड यांच्या ताब्यात आहे. सातबार्यावरही भांड, देशमुख व जगताप कुटुंबांची नावे आहेत. काही महिन्यांपूर्वी चित्तेगावातील सय्यद हबीब, सय्यद बना व सय्यद नसीर यांनी या जमिनीवर कुळ कायद्यांतर्गत दावा केला. विशेष म्हणजे पैठणचे तत्कालीन तलाठी सानप यांनी सदर जमीन ही मयत सय्यद दगडू सय्यद रहीम यांची असून कुळ म्हणून त्यांचे नातू सय्यद हबीब, सय्यद बना व सय्यद दगडू यांचा या जमिनीवर ताबा आहे, असा पंचनामा बनविला व कुळ कायद्यांतर्गत या जमिनीची रजिस्ट्री तिघांच्या नावे करून देण्याचा रिपोर्ट दिला. त्यानुसार तहसीलदार राजीव शिंदे यांनी या गटातील ५ एकर जमिनीचा मालकीहक्क कुळ कायद्यांतर्गत वरील तिघांना बहाल केला. याशिवाय या जमिनीची रजिस्ट्री ही सय्यद बंधूंच्या नावे करण्याचा आदेश दुय्यम निबंधकांना दिले. त्यानुसार रजिस्ट्री करण्यात आली. बदली झाल्यानंतर काढली आॅर्डर भूमाफियांच्या घशात भांड कुटुंबाची जमीन घालण्याचा उद्योग सुरू असतानाच तहसीलदार शिंदे यांची पैठण येथून आष्टीला बदली झाली. ते आष्टी येथे रुजू झाल्यानंतर सदरील जमीन सय्यद बंधूंच्या नावे करून देण्याची आॅर्डर त्यांनी काढली. भांड यांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या कागदपत्रावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. सगळे काही बोगसच! हा प्रकार समजल्यानंतर भांड यांना धक्काच बसला. माहिती अधिकारात त्यांनी सर्व माहिती गोळा केली. ही जमीन सय्यद बंधूच्या ताब्यात असल्याचा खोटा पंचनामा करण्यात आल्याची घटना समोर आली. ४ जमिनीवर वहिती लावण्यासाठी सय्यद हबीबच्या नावे करण्यात आलेला अर्र्जही तलाठी सानपने आपल्या हस्ताक्षरात लिहिलेला असल्याचे हस्ताक्षर तज्ज्ञाने केलेल्या तपासणीत उघडकीस आले आहे. पैठण ठाण्यात गुन्हा दाखल आपली जमीन बनावट कागदपत्र तयार करून तहसीलदार, तलाठी यांनी भूमाफियांच्या घशात घातल्याचे लक्षात आल्यानंतर भांड यांनी माहिती अधिकारात मिळविलेली सर्व कागदपत्रे घेऊन पैठण पोलीस ठाणे गाठले आणि तहसीलदार शिंदे, तलाठी सानप व तिन्ही सय्यद बंधू, अशा पाच जणांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली. त्यावरून या पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घोळात घोळ खोटा पंचनामा करतानाही तलाठी सानप यांनी एक मोठी चूक केली. त्यांनी सय्यद बंधूंच्या ताब्यात ६१ नंबरच्या गटातील १७ एकर ९ गुंठे जमीन असल्याचे दाखविले; परंतु प्रत्यक्षात त्यापैकी केवळ ५ एकर जमीनच त्यांच्या नावे करून दिली.