दौलताबाद बायपाससाठी अब्दीमंडीतील वादग्रस्त गटांतून होणार भूसंपादन
By विकास राऊत | Updated: July 14, 2025 14:10 IST2025-07-14T14:02:04+5:302025-07-14T14:10:01+5:30
चार किलोमीटरच्या दौलताबाद बायपाससाठी १९ हेक्टर जमीन घेणार

दौलताबाद बायपाससाठी अब्दीमंडीतील वादग्रस्त गटांतून होणार भूसंपादन
छत्रपत संभाजीनगर : तालुक्यातील अब्दीमंडी येथील गट क्र. ११, १२, २६, ३७ व ४२ पैकी ११, १२, ३७ पैकी ११, १२ व ३७ वादग्रस्त गटांतील भूसंपादन दौलताबाद बायपासच्या अनुषंगाने सुरू होणार आहे. या गटातील (ई.व्ही. प्रॉपर्टी) जमिनीचा फेरफार गेल्यावर्षी झाल्याने महसूल प्रशासन गोत्यात आले होते. दौलताबाद भागातील नवीन ३.८ कि.मी. बायपास रस्त्यासाठी होणाऱ्या भूसंपादनासाठी त्या जमिनीची घाईगडबडीत खरेदी-विक्री करून एका दिवसांत सात-बाऱ्यात फेरफार केल्याचा व्यवहार का झाला, हे आता स्पष्ट झाले आहे.
ऑक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ या काळात गट क्र. ११, १२, २६, ३७ व ४२ येथील जमिनीचा कागदोपत्री सोपस्कार झाला. ती जमीन शत्रूसंपत्ती आहे की नाही, निर्वासित आहे की, खासगी मालकीची याचा संभ्रम अजूनही कायम आहे.
शत्रूसंपत्ती म्हणून त्या जागेवर महसूल प्रशासनाने बोर्ड लावला होता, तर निर्वासित मालमत्ता म्हणून त्याबाबत न्यायालयाच्या आदेशाने प्रशासनाने निर्णय दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ‘लोकमत’ने याप्रकरणी जमिनीच्या खरेदी-विक्रीनंतर ज्यांच्या नावे जमीन झाले, त्याबाबत चौकशी करण्यात आली. दौलताबाद बायपाससाठी अब्दीमंडीतून जाणाऱ्या रस्त्यासाठी सुमारे १५० जणांची १९ हेक्टर जमीन संपादन होणे शक्य आहे. २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार एकास चाैपट दर अशा पद्धतीने भूसंपादन झाल्यास अब्दीमंडीतील या वादग्रस्त जमिनीतून सुमारे १४.५ एकर जमीन रस्त्यात जाणार आहे. सध्या वादग्रस्त गटातील खरेदी-विक्री थांबलेली आहे.
२१ कोटींतून बायपासचे चौपदरीकरण
एनएचएआयने मध्य प्रदेशच्या क्लासिक इन्फ्रा या संस्थेला २१ कोटींतून ३.८ कि.मी. चौपदरीकरणाचे काम दिले आहे. ४५ कोटींची निविदा होती. सुमारे ५३ टक्के कमी दराने क्लासिकने हे काम घेतले. आठ महिने कामाची मुदत आहे. १२ कोटी भूसंपादनासाठी लागतील. ग्रीनबेल्ट, चार चौकांचा कामात समावेश आहे.
कोणत्या गटातून होणार आहे मोजणी ?
अब्दीमंडीतील गट नं.११, १२, १३, १६, १८, १९, २१, २२, २४, २५, ३७ व ३९ मध्ये भूमी अभिलेख विभागाने मध्यंतरी अतितातडीने मोजणी केली आहे. यापैकी ११, १२ व ३७ क्रमांकाच्या गटासह इतर १९ गटांतील भूसंपादनाची अधिसूचना एनएचएआयने कलम ३ नुसार प्रसिद्ध केली आहे. ०५४७५६ क्रमांकावर रजिस्टरमध्ये जमीन मोजणीची नोंद आहे. वादग्रस्त गटाप्रकरणी काही आक्षेप आले, तर त्यावर एनएचएआय भूसंपादन विभाग निर्णय घेईल.
कायदेशीररीत्या भूसंपादन
दौलताबाद बायपास ३.८ कि.मी.चा रस्ता असून तो ४५ मीटर रुंद असेल. कायदेशीररीत्या सर्व बाबी समजूनच भूसंपादन होईल.
- विजय राऊत, भूसंपादन अधिकारी एनएचएआय