जालना : जुना जालन्यातील इन्कमटॅक्स कॉलनी भागात चोरट्यांनी घर फोडून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी भरदिवसा घडली. येथील विजय काशीनाथ कोल्हे (३६) हे भाग्यनगर भागात आपल्या बहिणीच्या घरी एका कार्यक्रमानिमित्त कुटुंबियांसह घराला कुलूप लावून दुपारी २ वाजता गेले. हा वर्दळीचा रस्ता असला तरी उन्हामुळे या भागातील रहिवासी घरातच असतात. हीच संधी साधून चोरट्यांनी कोल्हे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दोन्ही कपाटातील अडीच तोळे सोने, अर्धा किलो चांदीचे भांडे तसेच रोख सात हजार रुपये असा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. सायंकाळी ६ वाजता विजय कोल्हे हे आपल्या प्रतिष्ठानावर गेले. तर त्यांच्या आई व पत्नी घरी परतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. या प्रकाराची माहिती कळताच कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. (प्रतिनिधी) चोर्या, घरफोड्यांचे सत्र सुरूच शहरात चोर्या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. इन्कमटॅक्स कॉलनी भागात यापूर्वीही तीन-चार घरफोड्या झालेल्या आहेत. मात्र त्यांचा तपास अद्याप शून्य आहे. विशेष म्हणजे वर्दळीचा रस्ता असतानाही तेथे ही चोरी झाल्यामुळे या भागातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.दरम्यान, या गुन्ह्याची रात्री उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती.
भर दिवसा सव्वा लाखाची घरफोडी
By admin | Updated: May 13, 2014 01:13 IST