२८ वर्षांपासून हमखास ‘लालदिवा’!

By Admin | Updated: November 5, 2014 00:58 IST2014-11-05T00:19:54+5:302014-11-05T00:58:56+5:30

संजय तिपाले , बीड मागास जिल्हा अशी ओळख असलेल्या बीडच्या नेत्यांनी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर छाप पाडली.

'Laldiva' for 28 years! | २८ वर्षांपासून हमखास ‘लालदिवा’!

२८ वर्षांपासून हमखास ‘लालदिवा’!


संजय तिपाले , बीड
मागास जिल्हा अशी ओळख असलेल्या बीडच्या नेत्यांनी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर छाप पाडली. राज्यात सत्ता कोणत्याही पक्षाची असो मंत्रिमंडळात बीडला नेहमी मानाचे स्थान मिळालेले आहे. मागील २८ वर्षांच्या कालावधीत केवळ एक अपवाद वगळता येथील लोकप्रतिनिधी ‘लाल दिव्या’च्या झगमगाटात मिरवले आहेत. प्रश्न एवढाच की, ‘किंगपोस्ट’वर राहणाऱ्या बीडच्या विकासाची गाडी मात्र वेगाने धावली नाही.
काल पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण विभागाच्या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात तर बीडकडे कॅबिनेटच्या जोडीला राज्यमंत्रिपदाचा ‘लाल दिवा’ही होता. क्रांतिसिंह नाना पाटील, प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंंडे या मातब्बरांची कारकीर्द बीडच्याच मातीत फुलली होती. इथल्या मातीचा गुणधर्मच निराळा. पिचलेल्या, गांजलेल्या लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इथल्या नेत्यांनीही कणखरपणाची चुणूक दाखवली. त्यामुळे बीडमधून विधानसभेत गेलेल्या लोकप्रतिनिधींना बेदखल करता आले नाही. दोन तपांपेक्षा अधिक काळ ‘लाल दिव्या’चा रुबाब गाजवत बीडच्या नेत्यांनी स्वत:चे मोठेपण सिद्ध केले. १९८४ पासून आजतागायत बीड जिल्ह्याकडे कायम ‘लाल दिवा’ राहिला. केवळ १९९० ते १९९१ या वर्षभरात बीडकडे मंत्रिपद नव्हते.
‘लाल दिव्या’चा मान मिळालेले नेते
सुंदरराव सोळंके हे जिल्ह्यातील पहिले कॅबिनेट मंत्री. १९७५ ते १९७७ या दरम्यान त्यांनी उद्योग व सार्वजनिक खात्याचा कार्यभार पाहिला. त्यानंतर १९८६ पासून पुढे बीडच्या नेत्यांनी अदलून - बदलून कायमच ‘लाल दिव्या’चा मान मिळविला. १९८६ ते १९८८ या दरम्यान अशोक पाटील हे राज्यमंत्री होते.
१९८८ ते ९० हा काळ गाजविला पंडितराव दौंड यांनी. ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९० ते ९१ या वर्षभरात बीडच्या एकाही आमदाराला मंत्रीपद मिळाले नव्हते. पुढे १९९१ ते ९५ या दरम्यान, शिवाजीराव पंडित यांनी महसूल राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. याच कालावधीत जयदत्त क्षीरसागर हे उपमंत्री व राज्यमंत्री राहिले. ९५ ते ९९ या काळात गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. जयसिंग गायकवाड, सुरेश नवले यांनीही याच दरम्यान राज्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. ९८ ते ९९ या दरम्यान, बदामराव पंडित यांनाही मंत्रीपदाची संधी मिळाली होती. ९९ ते २००४ या दरम्यान जयदत्त क्षीरसागर व डॉ. विमल मुंदडा असे दोन मंत्री जिल्ह्याला मिळाले. २००४ ते ०९ हा कार्यकाळही त्यांनीच गाजविला. २००९ ते १४ या दरम्यान एक नव्हे दोन नव्हे तर तीन मंत्रीपदे मिळाली. जयदत्त क्षीरसागर यांनी कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद भूषविले. तर प्रकाश सोळंके, सुरेश धस यांनाही लाल दिव्याच्या गाडीत बसण्याचा मान मिळाला.
२८ वर्षांच्या कार्यकाळात डझनभर नेत्यांनी मंत्रीपदे भूषविली. परंतु विकासाचे प्रश्न सुटलेच नाहीत. मुलभूत सुविधांच्या पलिकडे नवे काही होत नाही हे खरे दुखणे. लाल दिव्याच्या झगमगाटा सोबतच शेती, सिंचन, उद्योग, शिक्षण, प्रकल्प, रोजगार याला चालना मिळायला हवी, इतकीच जनतेची अपेक्षा आहे.

Web Title: 'Laldiva' for 28 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.