चाकूचा धाक दाखवून एक लाखाचा ऐवज लंपास
By Admin | Updated: June 23, 2014 00:27 IST2014-06-22T22:48:33+5:302014-06-23T00:27:24+5:30
राजूर: येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालून तीन घरे फोडली. चाकूचा धाक दाखवत रोख रकमेसह एक लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवार दि.२१ रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली

चाकूचा धाक दाखवून एक लाखाचा ऐवज लंपास
राजूर: येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालून तीन घरे फोडली. चाकूचा धाक दाखवत रोख रकमेसह एक लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवार दि.२१ रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी आलेले श्वान पथक माग न काढता तसेच परतले.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजूर येथील श्रीकृष्णनगर भागात दिनकर कौतिकराव पुंगळे यांचे घर आहे. शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चार चोरटयांनी घराच्या भिंंतीवरून वाड्यात उडी मारुन घरात प्रवेश केला. दिनकर पुंगळे यांच्या तोंडावर दांड्याने जोराचा ठोसा मारून जखमी केले. तसेच चाकू व लाकडी दांड्याचा धाक दाखवून तुम्हारे पास जो है, वो जल्दीसे निकालके दो, नही तो जान से मार देंगे, असे म्हणून जबरदस्तीने कपाटात ठेवलेले ५० हजार रूपये रोख व पत्नीच्या अंगावरील सोन्या, चांदीचे दागिने घेवून पोबारा केला. त्यांच्याच बाजूला राहात असलेले गजानन अंबादास पुंगळे यांच्या घरात प्रवेश करून १२ हजार रूपये रोख लंपास केले. त्यानंतर अशोक हिवराळे यांच्याकडे घरफोडी केली. घटनास्थळी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, हसनाबाद ठाण्याचे स. पो. नि. शीतलकुमार बल्लाळ यांनी भेट देवून पाहणी केली. घटनास्थळी जालन्याहून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वानाने मुख्य रस्त्यापर्यंत माग काढला. दि.२० रोजी रात्री राजुरेश्वर मंदिरासमोर असलेल्या नारळ प्रसादाची आठ दुकाने फोडून हजारो रूपयांचा ऐवज लंपास केला. दुसऱ्याच दिवशी राजुरात जबरी चोरीचा प्रकार घडल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. अलिकडे राजुरात वाढत्या चोऱ्यांचे प्रकार घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी चोरट्याविरूध्द हसनाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हसनाबाद ठाण्याचे सपोनि बल्लाळ हे करीत आहे.