तब्बल पावणेचार लाख क्विंटल तुरीची आवक
By Admin | Updated: March 18, 2017 23:48 IST2017-03-18T23:48:09+5:302017-03-18T23:48:47+5:30
जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेडच्या हमीभाव केंद्रावर यंदा तब्बल पावणेचार लाख क्ंिवटल तुरीची आवक झाली आहे

तब्बल पावणेचार लाख क्विंटल तुरीची आवक
जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेडच्या हमीभाव केंद्रावर यंदा तब्बल पावणेचार लाख क्ंिवटल तुरीची आवक झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही आवक दुप्पट असल्याचे सांगण्यात आले.
येथील बाजार समितीत हंगाम सुरू झाल्यापासून १६ मार्च अखेर ३ लाख ८ हजार ९२३ क्विंटल तुरीची आवक झाली तर नाफेडकडे ६८ हजार ७२२ क्विंटल तुरीची आवक झाली आहे. दोन्ही ठिकाणी मिळून ३ लाख ७७ हजार ६३१ क्विंटल तूर आवक झाली. गतवर्षी सर्व हंगाम मिळून १ लाख ५५ हजार ३०८ क्विंटल तुरीची आवक झाली होती. यंदा भाव कमी असले तरी आवक मात्र दुपटीने वाढत आहे. नाफेडकडेही तब्बल ६८ हजार क्विंटल तुरीची आवक झाली आहे. ही आवक अजून मोठ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज नाफेडच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा नाफेडमध्ये ५०५० भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा नाफेडकडे वाढला आहे. परिणामी नाफेडमध्ये तूर खरेदीची प्रक्रिया ठप्प होत आहे. खाजगी व्यापारी तुरीला साडेतीन हजार ते साडेचार हजार रूपयांपर्यंत प्रति क्विंटलला भाव देत आहे. पैसे नगदी मिळत असल्याने काही शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांनाच तुरीची विक्री करीत आहेत.
नाफेड केंद्राबाहरे अद्यापही शेकडो शेतकऱ्यांच्या रांगा कायम आहेत. परिसरात ट्रॅक्टर, बैलगाडीने भरलेला आहे. गर्दी वाढत असल्याने नाफेडकडूनही खरेदीवर परिणाम होत आहे. ३१ मे पर्यंत नाफेड तूर खरेदी करणार असल्याचे सागण्यात येते. एकूणच यंदा नाफेडलाही तुरीमुळे सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)