दैठणा येथील आगीत लाखोंचे नुकसान
By Admin | Updated: June 5, 2014 00:46 IST2014-06-05T00:30:58+5:302014-06-05T00:46:38+5:30
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा येथे ३ जूनच्या मध्यरात्री एका शेतकर्याच्या राहत्या घरास भीषण आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे़

दैठणा येथील आगीत लाखोंचे नुकसान
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा येथे ३ जूनच्या मध्यरात्री एका शेतकर्याच्या राहत्या घरास भीषण आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे़ त्याचबरोबर अनेक संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत़ शिवाय, आगीत एक म्हैसही होरपळी आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकर्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे़ तालुक्यातील दैठणा येथील शेतकरी बापूसाहेब बिरादार यांचे राहते घर मुख्य रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरास अचानक आग लागून घरातील अंथरूण, पांघरूण याच्यासह स्वयंपाकाची भांडीकुंडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जळून खाक झाले आहे़ त्याचबरोबर ज्वारी, गहू, तांदूळ, डाळ असे धान्यसुद्धा जळाले असल्याने या शेतकर्याचा संसारच ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर उघडा पडला आहे़ आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी गावातील तरूणांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही़ घराशेजारीच म्हैस बांधली होती. या आगीमध्ये सदरील म्हैस होरपळल्याने तसेच जनावरांचे वैरण़, गुळी हे सुद्धा जळून खाक झाल्यामुळे शेतकर्याला मोठा फटका बसला आहे. (वार्ताहर)आगीची घटना घडल्याचे समजताच महसूलच्या वतीने तलाठी दहीफळे, मंडळ अधिकारी जाधव यांनी घटनास्थळाला भेट देवून नुकसानीचा तात्काळ पंचनामा केला आहे़ यावेळी उपसरपंच योगेश बिरादार व कुमार बिरादार, कल्याणराव बिरादार, गणेश पाटील, विठ्ठलराव पाटील यांची उपस्थिती होती़ यावेळी झालेल्या पंचनाम्यामुळे सदरील शेतकर्याला तात्काळ मदत मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.