नेत्र शस्त्रक्रियांसाठी लेन्स अन्् साहित्याचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:13 PM2018-12-11T23:13:06+5:302018-12-11T23:13:19+5:30

घाटी रुग्णालयातील नेत्र विभागाला लेन्स आणि आवश्यक साहित्यांच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे.

 Lack of lens and material for eye surgery | नेत्र शस्त्रक्रियांसाठी लेन्स अन्् साहित्याचा तुटवडा

नेत्र शस्त्रक्रियांसाठी लेन्स अन्् साहित्याचा तुटवडा

googlenewsNext

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील नेत्र विभागाला लेन्स आणि आवश्यक साहित्यांच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (डीएमईआर) तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून हे साहित्य मिळत नाही. परिणामी, लायन्स क्लबसह इतर संस्थांची मदत घेण्याची वेळ येत आहे. तज्ज्ञ डॉक्टर असूनही केवळ साहित्याअभावी रुग्णांना शस्त्रक्रियेची प्रतीक्षा करावी लागत आहे.


राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत अंधत्व निवारणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यातील ज्या रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते, अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येतात; परंतु मागील काही महिन्यांपासून घाटीतील नेत्र विभागात या ठिकाणी नेत्र रुग्णांसाठी आवश्यक लेन्स, औषधीसह अन्य साहित्य, औषधच उपलब्ध नसल्याने नेत्र शस्त्रक्रियांना ब्रेक लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


नेत्र रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात जावे लागत असून, त्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. मागणी करूनही वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून साहित्य मिळत नाही. त्यामुळे अंधत्व निवारणासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाला गांभीर्य नसल्याची ओरड होत आहे. अशावेळी नेत्र रुग्णांना पुढची तारीख देऊन वेळ निभावली जाते. रुग्णालयात लेन्ससह इतर साहित्यांचा तुटवडा आहे. अनेक शस्त्रक्रिया रखडल्या जात आहेत.


लेन्स, औषधी पुरवठा
राष्ट्रीय अंधत्व कार्यक्रमांतर्गत लेन्स, औषधी देण्यात आलेली आहे. त्यांची मागणी अधिक आहे. तरीही मागणी केली तर आणखी पुरवठा केला जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.


दोन ते तीन रुग्णच
डोळ्याच्या बाहुलीच्या बाजूला असलेल्या गाठीच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे जीवनदायी योजनेतील दोन ते तीन रुग्णांच्या शस्त्रक्रिया थांबलेल्या आहेत. उर्वरित शस्त्रक्रिया सुरळीत सुरू आहेत, अशी माहिती घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांनी दिली.

Web Title:  Lack of lens and material for eye surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.