मालधक्क्यावरील धान्य व खताची नासाडी
By Admin | Updated: June 3, 2014 00:42 IST2014-06-03T00:36:43+5:302014-06-03T00:42:09+5:30
जालना : येथील रेल्वेच्या मालधक्क्यात उघड्यावर साठविण्यात आलेला सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदूळ व खत भिजल्याने प्रचंड नुकसान झाले.

मालधक्क्यावरील धान्य व खताची नासाडी
जालना : येथील रेल्वेच्या मालधक्क्यात उघड्यावर साठविण्यात आलेला सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदूळ व खत भिजल्याने प्रचंड नुकसान झाले. रविवारी रात्री अचानक रोहिण्यांचा पाऊस बसरल्याने हे नुकसान झाले. मात्र, या नुकसानीची कोठेही नोंद घेण्यात आली नाही. रेल्वे व्हॅगनचे भाडे वाचविण्यासाठी कंत्राटदाराने जवळपास १५०० पोते तांदूळ मोकळ्या जागेत उतरून घेतला होता. मालधक्क्याच्या फलाटावरच तांदळाच्या पोत्यांच्या सात थप्पी लावण्यात आल्या होत्या. त्यातील दोन थप्पीवर ताडपत्री टाकण्यात आली होती. उर्वरित तसेच सोडून देण्यात आले होते. विशेष म्हणजे कंत्राटदाराने या नुकसानीची कोठेही नोंद केली नाही. हा माल उचलून थेट गोदामात पाठविण्यात आला. त्यामुळे कोंदट वातावरणात हा तांदूळ सडून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून अनेक पोते फोडून माल उघड्यावर टाकण्यात आला होता. ठिकठिकाणी तांदळाचे ढीग लागले होते. त्या तांदळाची पूर्णत: नासाडी झाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने वरच्या भागातील पोत्यांमधील तांदूळ खराब झाला असावा, जास्त काही नुकसान झाले नसावे, असा पोकळ दावा करण्यात आला. ही जबाबदारी कोणाची हे नेमकेपणाने कोणीच सांगण्यास तयार नाही. उघड्यावर माल टाकून नुकसान करण्यात आले आहे. महाराष्ट्र मार्केटिंगच्या गोदामात साठविण्यात आलेले खतही पाण्याने भिजले आहे. पिवळ्या पोत्यातील हे खत कोणतीही चौकशी न करता गोदामात उतरून घेण्यात आले आहे. खताचे २ हजाराच्या जवळपास पोते उघड्यावर पडून होते. मालधक्क्याची जबाबदारी असणारे अधिकारी माध्यमांचे प्रतिनिधी आल्यामुळे निघून गेले. त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी याच मालधक्क्यावर गव्हाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करून रेल्वे व संबंधित विभागाचे लक्ष वेधले होते. त्यावेळीही हजारो क्विंटल गहू उघड्यावर पडला होता. पोती फोडून गव्हाची चोरीही झाली होती. मात्र, याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने शासनाचे हजारो क्विंटल धान्याचे नुकसान होत आहे. (प्रतिनिधी) कोणालाही सोयर सुतक नाही येथील रेल्वे मालधक्क्यावर नियमितपणे मोठ्या प्रमाणावर मालाची साठवणूक करण्यात येते. विशेषत: सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या धान्यासह खते व इतर कृषी मालाची आवक होते. हा माल नेहमीच उघड्यावर साठविला जातो. त्यामुळे पोती फोडून धान्याची चोरी होण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. परंतु, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. दरम्यान, रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे हजारो क्विंटल मालाचे मोठे नुकसान झाले. एवढे होऊनही संबंधित ठेकेदार किंवा प्रशासनाचा कुणीही अधिकारी- कर्मचारी इकडे फिरकलेदेखील नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्यांसाठी आलेल्या या धान्याची नासाडी होत असून, शासनाचेच नुकसान होत आहे, ही गंभीर बाब आहे.