जलकुंभाच्या परिसरात स्वच्छतेचा अभाव
By Admin | Updated: March 4, 2015 00:23 IST2015-03-04T00:19:57+5:302015-03-04T00:23:46+5:30
दत्ता थोरे / हणमंत गायकवाड / आशपाक पठाण ल्ल लातूर लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी लाखो लिटर्स क्षमतेचे पाच जलकुंभ आहेत.

जलकुंभाच्या परिसरात स्वच्छतेचा अभाव
दत्ता थोरे / हणमंत गायकवाड / आशपाक पठाण ल्ल लातूर लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी लाखो लिटर्स क्षमतेचे पाच जलकुंभ आहेत. या जलकुंभाच्या परिसरात स्वच्छतेचा अभाव तर आहेच आहे. परंतु, जलकुंभाला संरक्षण नसल्यामुळे पाणी सुरक्षित असेलच याची खात्री देता येत नाही. राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत चमू’ने शहरातील गांधी चौकातील व यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे असलेल्या जलकुंभावर चढून व्यवस्थेसंदर्भात पाहणी केली. मात्र तेथे कोणीही कर्तव्यावर नव्हते. परिणामी, जलकुंभाची सुरक्षा वाऱ्यावरच आहे. चमूचा हा प्रकार कोणाला खटकला नाही, त्यामुळे कोणी हटकलेही नाही. लातूर शहराची लोकसंख्या सहा लाखांच्या आसपास आहे. बार्शी रोडवर, नांदेड नाका, औसा रोडवरील महसूल कॉलनी परिसर, यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे, गांधी चौक अशी मोठी पाच जलकुंभ लातूर शहरात आहेत. गांधी चौकातील जलकुंभ पाचव्या टप्प्यात पूर्ण झालेला आहे. या जलकुंभावर पूर्ण गावभागात पाणीपुरवठा केला जातो. ३२ लाख लिटर्स पाणी साठवण क्षमतेच्या असलेल्या या जलकुंभातून अर्ध्या शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र हा जलकुंभ असुरक्षित आहे. जलकुंभाचा परिसरही अस्वच्छ असून, वर्दळीचा परिसर असला तरी कोणीच कोणाला येथे हटकत नाही. ‘लोकमत’ चमूने दुपारी १ वाजल्यापासून २ वाजेपर्यंत या जलकुंभावर चढून छायाचित्रे काढली. जलकुंभाखाली असलेल्या व्हॉल्वला हात लावून पाहिले. जवळपास पाऊण-एक तास गांधी चौकातील या जलकुंभातील काही वस्तूंनाही हात लावून पाहिले, परंतु, कोणीही हटकले नाही. तेथे थांबलेल्या नागरिकांनीही हटकले नाही. कर्तव्यावर तर तेथे कोणीच नव्हते. जलकुंभाची सुरक्षा असुरक्षितच होती. विशेष म्हणजे महानगरपालिकेने दिवसा तीन आणि रात्रीच्या वेळी तीन असे सहा कर्मचारी जलकुंभाच्या देखभालीसाठी नियुक्त केले आहेत. मात्र मंगळवारी दुपारी १ ते २ या वेळेत या जलकुंभाच्या ड्युटी कक्षात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. परिणामी, जलकुंभ व जलकुंभातील साहित्याची सुरक्षा असुरक्षित असल्याचे दिसले. यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या जलकुंभावरही ‘लोकमत’ चमूने प्रवेश केला. या जलकुंभाच्या सुरक्षेसाठी मनपाचा एकही कर्मचारी नियुक्त नसल्याचे समजले. या जलकुंभावरही अर्धा-पाऊण तास वर चढून पाहिले. परंतु, कोणत्या नागरिकांनी हटकले नाही आणि कर्मचारी तर येथे नाहीच. त्यामुळे हा जलकुंभही असुरक्षितच होता.